आठशे रुपयांसाठी मित्राचा खून करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 08:00 PM2018-08-18T20:00:58+5:302018-08-18T20:02:15+5:30
गेल्या महिन्यात शिवशाही हॉटेल समोर व कुणाल हॉटेलच्या मागील रस्त्यावर रहाटणी येथे उभ्या बसमध्ये धारधार शस्त्राने वार केलेल्या रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला होता.
पिंपरी-चिंचवड : वाकड येथे हात उसने घेतलेले आठशे रुपये आणि मेमरी कार्ड परत न दिल्याच्या रागातून ड्रायव्हर मित्राचा खून करणाऱ्या मित्राला वाकड पोलिसांनी एका महिन्यानंतर अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
अनिल श्रावण मोरे (वय ३९, रा. सायली पार्क रहाटणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पवन उर्फ अनिल रमेश सुतार-हिरे (वय ३९, रा चिंबळी, खेड) असे खून झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे. गेल्या महिन्यात शिवशाही हॉटेल समोर व कुणाल हॉटेलच्या मागील रस्त्यावर रहाटणी येथे उभ्या केलेल्या बसमध्ये धारधार शस्त्राने वार केलला रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला होता. याबाबत वाकड ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाकड तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक हरिष माने यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करत असताना सुतार काम करणारा मोरे हा मयताचा मित्र असून दोघेही व्यसनी आहेत. त्याचा खून झाल्यापासून मोरे गायब आहे व त्याचा फोनही लागत नाही, अशी माहिती पोलीस शिपाई शाम बाबा यांना मिळाली. त्यादिशेने तपास सुरू असतानाच कर्मचारी दादा पवार व धनराज किरणाळे यांना आरोपी बावधन येथील पीबीपी आयटी या शाळेत सुतार काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले.
मयत पवन उर्फ अनिल आणि आरोपी अनिल मोरे हे एकमेकांचे मित्र होते. नेहमी एकत्र दारूचे व्यसन करत काही दिवसांपूर्वी मयत अनिल याने आरोपीकडून हात उसने आठशे रुपये आणि मोबाईल मधील मेमरी कार्ड घेतले होते. त्याने ते अनेकदा मागूनही अनिल सुतार ती परत देत नसल्याने तो वाहनचालक म्हणून नोकरी करीत असलेल्या बसमध्ये पटाशी या हत्याराने मोरे याने डोक्यावर, गालावर, मांडीवर वार करून त्याचा खून केल्याचे कबुल केले.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक हरिष माने, कर्मचारी दादा पवार, धनराज किरणाळे, सुरेश भोसले, शाम बाबा, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, सागर सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.