रस्त्यांवरील चेंबर ठरताहेत धोकादायक, महापालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 12:55 AM2019-02-07T00:55:48+5:302019-02-07T00:56:10+5:30

शहरातील चिंचवड, पिंपरी, निगडी, काळेवाडी, रावेत अशा कुठल्याही परिसरात तुटक्या, उघड्या, जास्त उंचीच्या, खचलेल्या, चेंबरवर राडारोडा टाकलेला, कचरा दिसतो आहे.

 Dangerous roadmap, road clearance of Municipal Corporation | रस्त्यांवरील चेंबर ठरताहेत धोकादायक, महापालिकेचे दुर्लक्ष

रस्त्यांवरील चेंबर ठरताहेत धोकादायक, महापालिकेचे दुर्लक्ष

Next

- शीतल मुंडे

पिंपरी  - शहरातील चिंचवड, पिंपरी, निगडी, काळेवाडी, रावेत अशा कुठल्याही परिसरात तुटक्या, उघड्या, जास्त उंचीच्या, खचलेल्या, चेंबरवर राडारोडा टाकलेला, कचरा दिसतो आहे. यामुळे अपघाताचे व कंबरेच्या आजाराने नागरिक त्रस्त झालेले आहेत. काही ठिकाणी चेंबरचाच श्वास कोंडत आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. काही परिसरातील व्यावसायिकांनी तर चेंबरवर साहित्य ठेवून अतिक्रमण केले आहे.
शहरातील चेंबरची अवस्था अतिशय दयनिय आहे. महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. पावसाळी पाणी व सांडपाणी वाहून नेण्यासाठी शहरात सर्वत्र बंदिस्त गटार आहेत. महापालिकेकडून त्यासाठी मोठा खर्च करण्यात येतो. या गटारांवरील चेंबरच्या दुरुस्तीकडे मात्र महापालिका दुर्लक्ष करीत आहे. गटारांवरील चेंबरवर कचरा, राडारोडा, माती, दगडे आहेत. चेंबर रस्त्याच्या समांतर असणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश चेंबर उंच किंवा खोल आहेत. प्रमुख रस्त्यांवरील बहुतांश चेंबर खचल्यामुळे अपघाताचा धोका आहे. चेबंरची झाकणे किंवा जाळ्या तुटल्या आहेत. असे चेंबर चुकवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणच्या गटारी खुल्याच आहेत.
बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे अशा ठिकाणी अपघाताचा धोका आहे. अपूर्ण बांधकामामुळे येथे सळया उघड्या आणि धोकादायक स्थितीत आहेत. वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवरही ही समस्या आहे. शहरातील काही चेंबरची स्थिती अतिशय वाईट आहे. रस्त्याकडेच्या चेंबरवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. चेंबर झाकण्यासाठी लाकडे, दगड, वाहनांचे सीट कवर, कपडे यांचा वापर केला जातो. रस्त्यांच्या समांतर नसलेल्या चेंबरच्या झाकणांमुळे वाहतुकीचा वेग मंदावतो. परिणामी कोंडी होते. अनेक ठिकाणी सिमेंटची झाकणे तुटलेली आहेत. लोखंडी झाकणांचा पत्रा उचकटल्याचेही दिसून येते.

खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका
शहरातील मुख्य रस्त्यांवरील चेंबर खचलेले आहेत. चेंबर खचल्याने रस्त्यावर खड्डे झाले आहेत. वाहनचालकांना धोकादायक चेंबर आणि खड्डा सहज दिसून येत नाही. त्यामुळे असा चेंबर आणि खड्डा चुकवितान चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटते. परिणामी अपघात होतात. काळेवाडी येथील मुख्य रस्त्यावर चेंबरच्या लोखंडी जाळीच्या बाजूला मोठा खड्डा आहे. हा खड्डा थेट चेंबरमध्ये जातो. दुचाकीचालक या खड्ड्यात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे उपाययोजनेची मागणी होत आहे.

टोलवाटोलवी : अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव

लोखंडी जाळीच्या चेंबरचे काम महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे आहे. मैलामिश्रित आणि सांडपाणी वाहिन्यांच्या तसेच त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी स्थापत्य विभागाकडे आहे. त्या वाहिन्यांची किंवा चेंबरची दुरुस्ती त्वरित करण्यात येते. चेंबरवरील राडारोडा, कचरा उचलण्याची जबाबदारी स्थापत्य विभागाची नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राडारोडा आणि कचरा उचलण्यात येतो.
- अंबादास चव्हाण, शहर अभियंता

बंद झाकणाच्या चेंबरभोवतीचे खड्डे निदर्शनास आले की, लगेचच चेंबरची दुरुस्ती करण्यात येते. चेंबर शक्यतो रस्त्याच्या समांतर असतात. शहरातील मुख्य रस्त्यांवर चेंबरजवळ खड्डे होतात, असे खड्डे लगेच बुजविण्यात येतात.
- संजय भोसले, कार्यकारी अभियंता, महापालिका

चेंबर खचल्याने ठिकठिकाणी खड्डे झाले आहेत. खड्डा सहज दिसून येत नसल्याने भरधाव वाहने तेथे आदळतात. वाहनांचे नुकसान होते. त्यामुळे दुचाकीचालकांना पाठीचे आणि मणक्यांचे आजार होत आहेत.
- नीता पाटील,
वाहनचालक, काळेवाडी

चेंबर नेमके कशासाठी तयार केलेले आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्याकडेच्या चेंबरवरही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. खचलेल्या चेंबरमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा दुचाकीचे टायर त्यामध्ये अडकते आणि अपघात होतो.
- अजित वैद्य, वाहनचालक, चिंचवड

उंदीर, घुशींचा उपद्रव
शहरातील काही चेंबरची झाकणे फोडण्यात किंवा तोडण्यात आल्याचे दिसून येते. हॉटेल व्यावसायिक अशी तोडफोड करतात. हॉटेलचे शिळे अन्न किंवा अन्न शिजविल्यानंतरचे पाणी, सांडपाणी थेट चेंबरमध्ये टाकतात. त्यामुळे अशा चेंबरजवळ उंदीर, घुशींचा वावर वाढत आहे. अशा ठिकाणी गटार पोखरून उंदीर आणि घुशींकडून गटाराची, चेंबरची आणि पर्यायाने रस्त्याचीही नासधूस करण्यात येते. यामुळे सातत्याने वाहिन्यांची दुरुस्ती करावी लागत आहे.

Web Title:  Dangerous roadmap, road clearance of Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.