पिस्तूल, चाकूचा धाक दाखवून भर दिवसा दरोडा, साडेदहा लाखांचा ऐवज लुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 08:40 PM2023-01-10T20:40:55+5:302023-01-10T20:41:08+5:30

तळेगाव दाभाडे येथील किराणा दुकानदाराच्या घरात दरोडा

Daylight robbery with pistols and knives, loot of Rs.1050000 lakhs | पिस्तूल, चाकूचा धाक दाखवून भर दिवसा दरोडा, साडेदहा लाखांचा ऐवज लुटला

पिस्तूल, चाकूचा धाक दाखवून भर दिवसा दरोडा, साडेदहा लाखांचा ऐवज लुटला

googlenewsNext

पिंपरी : किराणा दुकानदाराच्या घरात भरदिवसा घुसून दरोडेखोरांनी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला. यात तीन ते साडेतीन लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण साडेदहा लाखांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी (दि. १०) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे तळेगाव दाभाडे परिसरात खळबळ उडाली.

दिलीप चंपालाल मुथा (वय ५५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुथा यांचे वडगाव मावळ येथे किराणा दुकान आहे. ते त्यांच्या पत्नीसह मंगळवारी वडगाव येथे त्यांच्या किराणा दुकानात गेले होते.

जेवण करण्यासाठी ते दोघेही तळेगाव येथील घरी दुपारी दोनच्या सुमारास आले. त्यावेळी घरात त्यांच्या दोन मुली होत्या. मुथा हे पत्नीसह घरी आले असता त्याचवेळी चार -पाच अनोळखी व्यक्ती मुथा यांच्या घरात घुसले. त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता. त्यांनी मुथा आणि त्यांच्या कुटुंबियांना पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखविला. त्यामुळे मुथा कुटुंबिय भयभीत झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी मुथा यांच्या घरातील तीन ते साडेतीन लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण साडेदहा लाखांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर दरोडेखोर त्यांच्या दुचाकीवरून पळून गेले. या प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत. दरोडाप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Daylight robbery with pistols and knives, loot of Rs.1050000 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.