देहूरोड - देहूरोड येथे टोळक्याने हातात लाठ्या, काठ्या, दांडकी घेऊन एटीएम व वाहनांची तोडफोड करीत दगडफेक केली. यात चार पोलीस कर्मचारी तसेच दोन होमगार्ड जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी ८० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, बावीस जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून लाकडी दांडके, चार काठ्या, लोखंडी गज, तलवार हस्तगत करण्यात आल्या.देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागीलवर्षी पारशी चाळ झोपडपट्टीत राहणाऱ्या आरोपींनी गांधीनगर झोपडपट्टी येथे राहत असलेल्या एका गुन्हेगाराचा खून केला होता. या मृत गुन्हेगाराच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी त्याच्या पाठीराख्यांनी संबंधित मृताचा वाढदिवस साजरा करून पारशी चाळ परिसरातील आरोपी त्यांचे नातेवाईक आणि स्थानिक रहिवाशांना तसेच देहूरोड शहरात दहशत दाखविण्यासाठी परिसरातील वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी पारशीचाळ, सवाना चौक येथे बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास सवाना चौकात शस्त्रासह आलेल्या टोळक्याने दंगा सुरु केला. पोलिसांनी आदेश दिला असता त्यास नेजुमानता जमावाने हातात लाठ्या, काठ्या, दांडकी घेऊन दंगाकरीत धक्काबुक्की करून दगडफेक केली.यात चार पोलीस कर्मचारी तसेच दोन गृहरक्षक दलाचे जवान जखमी झाले आहेत. दंगल शमविण्याचा पोलीस प्रयत्न करीत असताना पोलिसांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात अडथळा निर्माण केला. तसेच जमलेल्या जमावाने केलेल्या दगडफेकीत, लोखंडी गज, लाठ्याच्या हल्ल्यात दोन एटीएमच्या काचा फोडत दोन दुचाकीची तोडफोड करून नुकसानही केले. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे ८० ते ९० जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत ५ अल्पवयीनांना ताब्यात घेत २२ जणांना अटक केली आहे.
देहूरोडमध्ये पुन्हा तोडफोड, बावीस जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 3:12 AM