आळंदी : संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला देहूनगरीत वारकऱ्यांनी तसेच भाविकांनी गर्दी न करता आपआपल्या भागात मोजक्याच वारकऱ्यांत बीज सोहळा साजरा करून पोलिस व आरोग्य सेवा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसआयुक्तालयाचेआयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केली.
तीर्थक्षेत्र देहुत ३० मार्चला बीज सोहळा आहे. मात्र सध्या कोरोना संसर्ग वाढत आहे. यापार्श्वभुमीवर तीर्थक्षेत्र आळंदीत वारकरी संप्रदायातील विविध वारकरी संस्थांचे पदाधिकारी, महाराज मंडळी व संप्रदायातील क्रियाशील मान्यवरांच्या समवेत आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी विशेष सुसंवाद बैठक घेतली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे, उपआयुक्त मंचक इप्पर, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, आत्माराम महाराज शास्त्री, पांडुरंग महाराज शितोळे, पंडित महाराज क्षीरसागर, कल्याण महाराज गायकवाड, नरहरी महाराज चौधरी, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, माजी शिवसेनेचे खेड तालुका प्रमुख उत्तम गोगावले, सचिव अजित वडगावकर मान्यवर उपस्थित होते.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, देहुत फार गर्दी झाल्यास आरोग्य सेवा व पोलिस प्रशासनावर ताण येईल. मात्र कोरोना महामारी वाढेल. यामुळे सर्वांच्या आरोग्याचे दृष्टीने वारकरी संप्रदायाने देहुत यात्रेला गर्दी करू नये. विशेष म्हणजे बंडातात्या कराडकरांनी संयमी भूमिका घ्यावी. शांततेला गालबोट लागेल असे विधान करू नये. नियमावली झुगारून सोहळा साजरा केला तर वारकरी संप्रदाय कोरोणाने बाधित होईल. संयम दाखवून तसेच शासनाचया नियमवलीत अधीन राहून हा सोहळा संपन्न होईल. बिजोत्सव सोहळा देखील वारकरी आणि नागरिकांनी घरी बसून साजरा करावा.
दरम्यान, वारकरी संप्रदायावर धार्मिक कार्यक्रमांची बंधने शिथिल करून धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, भजन, अखंड हरिनाम सप्ताह ५० ते १०० वारकरी भाविकांच्या उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी केली. बैठकीचे सूत्रसंचालन संग्रामबापू भंडारे, प्रस्ताविक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे तर धनवे महाराज यांनी आभार मानले.
" राज्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर देहूत बीज सोहळा ५० वारकऱ्यांमध्ये साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मागील वर्षभर सर्व सण- उत्सव तसेच आषाढीवारी देखील आपण मोजक्या वारकऱ्यांत साजरी केली आहे. तरीही शासनाची भुमिका मदत करण्याची आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सर्वांवर बधने आहेत. सर्वांचे सुरक्षिततेसाठी हे नियोजन असून कोणीही सुरक्षिततेच्या बाबतीत आडमुठी भुमिका घेऊ नये. - रामनाथ पोकळे, सहआयुक्त.