दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिला दिलासा
By admin | Published: August 18, 2015 11:47 PM2015-08-18T23:47:01+5:302015-08-18T23:47:01+5:30
चॉकलेट, गोळ्या, बिस्किटांऐवजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात दुष्काळी भागातील, डोक्यावर पाणी घालून डाळिंबाच्या बागा जगविणारे हरितक्रांती फार्मर्स क्लब, उंबरगाव
पिंपरी : चॉकलेट, गोळ्या, बिस्किटांऐवजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात दुष्काळी भागातील, डोक्यावर पाणी घालून डाळिंबाच्या बागा जगविणारे हरितक्रांती फार्मर्स क्लब, उंबरगाव, (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांची डाळिंबे विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा अभिनव उपक्रम माणमधील अभिनव फार्मर्स क्लबतर्फे राबविण्यात आला.
या उपक्रमातून होणाऱ्या डाळिंबविक्रीचे सर्व पैसे उंबरगाव येथील शंकर पवार आणि त्यांच्या फर्ममधील शेतकऱ्यांना देण्यात आले.
डाळिंब विकत घेऊन माण तालुक्यातील सुनील नामदेव भरणे, माजी उपसरपंच माण आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी जिल्हा परिषद शाळा, माण येथील २००० विद्यार्थ्यांना डाळिंबवाटप करून सोलापूरच्या शेतकऱ्यांना मदत केली आहे.
मुळशी तालुक्यातील सुरेश हुलावळे यांनी या शेतकऱ्यांची डाळिंब विकत घेऊन हिंजवडी, माण अपंग शाळा, चांदे, नांदे, मूलखेड, घोटवडे येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये वाटप करून शेतकऱ्यांना मदत केली.
माण येथील सामाजिक कार्यकर्ते राम बोडके यांनी जिल्हा परिषद शाळा, बोडकेवाडी येथील १५० विद्यार्थी व नागरिकांना वाटून एक वेगळा उपक्रम येथे सुरू केला आहे. अशोक अप्पा साठे यांनी पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या शाळांमध्ये डाळिंब विकत घेऊन वाटप करण्यात आले. चॉकलेटऐवजी डाळिंब मिळाल्याने विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला. डाळिंबामुळे हिमोग्लोबीनमध्येही वाढ होते.
चंद्रकांत भूमकर भूमकरवस्ती यांनीही भूमकरवस्तीवरील शाळेमध्ये डाळिंबवाटप करून शेतकऱ्यांना
मदत केली. अशा पद्धतीने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यामध्ये ५ टन डाळिंबांचे वाटप करून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली. अभिनव फार्मर्स क्लबच्या या उपक्रमाचे ज्ञानेश्वर बोडके, शंकर पवार, भानुदास वैराट यांनी
कौतुक केले. (प्रतिनिधी)