मातृभाषेविषयी उदासीनता - उषा तांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:19 AM2018-08-18T00:19:12+5:302018-08-18T00:20:28+5:30
आज साहित्य संस्थांच्या कार्यपद्धतीत कमालीचा फरक पडला आहे. पूर्वी साहित्य वाद असायचे आता साहित्यापर्यंत आपण पोहोचत नाही, भाषा कशी टिकेल इथपासूनच सुरूवात होते.
पुणे - आज साहित्य संस्थांच्या कार्यपद्धतीत कमालीचा फरक पडला आहे. पूर्वी साहित्य वाद असायचे आता साहित्यापर्यंत आपण पोहोचत नाही, भाषा कशी टिकेल इथपासूनच सुरूवात होते. भाषेचे व्याकरण , शुद्धधीकरण, प्रमाण भाषा, बोलीच का मानायची? अशा चर्चा ऐकायला मिळतात. घरातून बाहेर पडलो की समाजाची भाषा बोलू लागतो. मराठी भाषिकच मातृभाषेविषयी विशेष आग्रही नसतात, अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषद व जोगळेकर कुटुंबीयांच्या वतीने उषा तांबे यांना डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कार देऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पराग जोगळेकर उपस्थित होते.
डॉ. गं.ना जोगळेकर यांच्या नावाने मिळणारा हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे, अशी भावना व्यक्त करून उषा तांबे यांनी जोगळेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. कराडला साहित्य संमेलन होते. त्यामधील एका परिसंवादाचे सूत्रसंचालन माझ्याकडे दिले होते. त्या परिसंवादातील एकही वक्ता माझ्या ओळखीचा नव्हता. तेव्हा जोगळेकर यांनी मला विविध ठिकाणाहून आलेल्या सगळ्या वक्त्यांची माहिती दिली. संमेलन म्हणजे टीकेचे धनी होण्याचा कार्यक्रम असतो. पण ते निभावण्याची ताकद त्यांच्यात होती, असे त्या म्हणाल्या.
तुम्ही काही चिलखत घालून जाता का संमेलनाला?
साहित्य महामंडळात काम करताना अनेक संघर्षाला पदाधिका-यांना तोंड द्यावे लागते. कुठेही काही घडते आणि महामंडळालाच विचारले जाते. मला आई गंमतीने म्हणायची तुम्ही काही चिलखत घालून जाता का संमेलनाला? अशी मिस्किल टिप्पणी करीत संमेलन नवीन लोकांना संधी दिली तर कोण हे? यांना आम्ही ओळ्खतच नाही आणि प्रस्थापित लोकांना बोलावले तर यांच्याशिवाय दुसरे दिसत नाहीत का? असे दोन्ही बाजूने बोलले जाते. संमेलन अखिल भारतीय आहे तर सर्व घटक संस्था सहभागी करून घ्यायला पाहिजेत का नकोत? असा सवालही डॉ. उषा तांबे यांनी केला.