‘धन्वंतरी’चे ११ कोटी वळविले
By admin | Published: December 24, 2016 12:34 AM2016-12-24T00:34:55+5:302016-12-24T00:34:55+5:30
धन्वंतरी योजनेंतर्गत महापालिका सेवेतील, तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, तसेच कुटुंबातील सदस्यांनी वैद्यकीय उपचार
पिंपरी : धन्वंतरी योजनेंतर्गत महापालिका सेवेतील, तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, तसेच कुटुंबातील सदस्यांनी वैद्यकीय उपचार घेतले आहेत, अशा तीन हजार २४१ रुग्णांवर उपचाराच्या बिलांची १३ कोटी ८९ लाखांची रक्कम धन्वंतरी पॅनलवरील रुग्णालयांना देणे आवश्यक आहे. या योजनेच्या लेखाशीर्षावर सध्या सव्वाकोटीच शिल्लक असल्याने उर्वरित ११ कोटी रुपये इतर लेखाशीर्षावरून वर्ग करण्यात येणार आहेत. त्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.
महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, तसेच कुटुंबातील सदस्य आणि निवृत्त अधिकारी, कर्मचारी दाम्पत्यासाठी १ सप्टेंबर २०१५ पासून धन्वंतरी योजना सुरू केली आहे. त्यानुसार १ एप्रिल २०१६ ते ३१ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांनी उपचार घेतले आहेत. त्यांची बिलांची संख्या पाच हजार १३५ इतकी आहे. त्यांपैकी अद्यापपर्यंत तीन हजार २४१ रुग्णांवर उपचारापोटी केलेल्या बिलांची रक्कम देणे प्रलंबित आहे. या प्रलंबित बिलांची रक्कम १३ कोटी ८९ लाख १९ हजार रुपये आहे. त्यामुळे ही रक्कम धन्वंतरी पॅनलवरील रुग्णालयांना देणे आवश्यक आहे. त्यामध्ये स्थायी आस्थापनेवरील ३ कोटी, अस्थायी आस्थापनेवरील १ कोटी, उपकरणे खरेदीवरील ६ कोटी, एनयूएचएम वरील १ कोटी अशी ११ कोटी रक्कम वर्ग करण्यात आली. (प्रतिनिधी)