धूळखात पडलेले गाळे वितरित करा : महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:52 AM2017-07-29T05:52:18+5:302017-07-29T05:52:20+5:30
महापालिकेचे शहरातील विविध ठिकाणी असलेले २१८ व्यापारी गाळे वापराशिवाय पडून आहेत. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न बुडत आहे.
पिंपरी : महापालिकेचे शहरातील विविध ठिकाणी असलेले २१८ व्यापारी गाळे वापराशिवाय पडून आहेत. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न बुडत आहे. व्यापारी गाळ्याच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसेल, तर जाहीर लिलाव करून गाळे वितरित करण्याचे आदेश महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच पालिकेकडे पडून असलेल्या सर्व भंगाराची विक्री करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त दालनात भूमी जिंदगी विभागाची आढावा बैठक झाली. सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक लक्ष्मण उंडे, तुषार कामठे, आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य निरीक्षक विजय खोराटे आदी बैठकीला उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत माहिती देताना महापौर काळजे म्हणाले, की महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून गाळे बांधले आहेत. शहरातील विविध ठिकाणी व्यापारी गाळे धूळखात पडून आहेत. गाळे का बंद आहेत? स्थापत्य विभागाने भूमी जिंदगी विभागाकडे गाळे का दिले नाहीत, याची सर्व माहिती मागविली आहे.