कार्यकर्त्यांची झाली चांदी, भाजपाच्या बूथप्रमुखांना दिवाळीची अनोखी भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 01:35 AM2018-11-07T01:35:11+5:302018-11-07T01:35:25+5:30
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून सुज्ञ मतदार आणि पक्षातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने साड्या, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भेटवस्तू देण्याचा धडाका लावला आहे.
पिंपरी - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून सुज्ञ मतदार आणि पक्षातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने साड्या, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भेटवस्तू देण्याचा धडाका लावला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी एका वरिष्ठ नेत्याने भाजपाचे बूथप्रमुख आणि शक्तिकेंद ्रप्रमुखांना चांदीचे नाणे वाटल्याने ऐनदिवाळीत यंदा कार्यकर्त्याची चांदी झाल्याची चर्चा आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक २०१९ ला होणार आहे. त्यामुळे इच्छुक सामाजिक आणि राजकीय उपक्रम राबवून शक्तिप्रदर्शनावर भर देत आहेत. मतदारांशी आपली नाळ आहे, हे सिद्ध करून दाखवीत आहेत. भेटकार्डाबरोबरच फराळाची पाकिटेही वाटली जात आहेत. मतदारांना खूश करण्यासाठी दिवाळी पहाटसह अनेक क्लृप्त्या लढविल्या जात आहेत.
महापालिका, लोकसभा अथवा विधानसभेची निवडणूक असो; पूर्वी भेळ आणि चहावर कार्यकर्ते जीव ओतून काम करीत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत भेळीवरचे कार्यकर्ते गायब झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना भेटवस्तू किंवा पैसे दिले जातात. मात्र, निवडणूकपूर्व संघटना बळकट करण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना विविध वस्तू देण्याचे फॅड सुरू झाले आहे.
भोसरी विधानसभेतील एका उमेदवाराने कार्यकर्त्यांना दिवाळी भेट म्हणून साड्या तर दुसऱ्याने इस्त्री, घड्याळ अशा भेटवस्तू दिल्या आहेत. चिंचवड विधानसभेतील इच्छुक उमेदवारांनी साड्यांसह कार्यकर्त्यांना कपडे भेट दिले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघ मोठा आणि मोक्याचा आहे. विद्यमान नेत्यांनी मतदारांपर्यंत विविध उपक्रम नेण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पक्षाच्या चिन्हाच्या चांदीच्या नाण्यांचे वाटप
लोकसभेसाठी इच्छुक असणाºया भारतीय जनता पक्षाच्या एका इच्छुकाने पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत, उरण या भागातील बूथप्रमुख आणि शक्तिकेंद्रप्रमुखांना अनोखी दिवाळी भेट दिली आहे. सुमारे दोनशे ग्रॅमचे चांदीचे नाणे भेट दिले आहे. त्यावर एका बाजुला लक्ष्मीचे चित्र असून, नाण्याच्या दुस-या बाजुला कमळाचे चिन्हही आहे. पिंपरीत ३०० बूथ असून शक्तिकेंद्रांसह पाचशे जणांची टीम आहे, तर चिंचवडमध्ये चारशे बूथ असून शक्तिकेंद्रासह सहाशे जणांची टीम आहे. मावळमध्ये चारशे, पनवेलमध्ये ४५०, उरण आणि कर्जतमध्ये सातशे जणांची टीम आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत कार्यकर्त्यांची चांदी झाली आहे. बूथप्रमुख आणि शक्तिकेंद्रप्रमुखांना बूस्टर दिले आहे.