पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील महापालिका शाळांमधीलशिक्षकांना ड्रेसकोड असावा, या संदर्भात धोरण तयार करण्यास शिक्षण समितीने मान्यता दिली. अध्यक्षस्थानी मनिषा पवार होत्या.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालविल्या जातात. या शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य महापालिकेच्या वतीने पुरविले जाते. महापालिकेच्या ८७ शाळा प्राथमिक आहेत. तर माध्यमिक विद्यालये १९ आहेत. तसेच हिंदी विद्यालये २, उर्दू शाळा १४, इंग्रजी शाळा २ आहेत.महापालिका भवनातील तिसऱ्या मजल्यावरील स्थायी समितीच्या सभागृहात महापालिका शिक्षण समितीची सभा झाली. यावेळी शिक्षणाधिकारी ज्योत्सना शिंदे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी पराग मुंडे, सदस्य भाऊसाहेब भोईर, सुलक्षणा धर शिलवंत, शशिकांत कदम, चंदा लोखंडे, सागर गवळी, रेखा दर्शिले आदी उपस्थित होते. यावेळी महापालिका शाळांतील विविध प्रश्नांवर चर्चा झाली.महापालिका शाळांतील शिक्षकांना ड्रेसकोड देण्यात यावा, असा ठराव समितीने ऐनवेळी मंजूर केला. याबाबत शिक्षणाधिकारी ज्योत्सना शिंदे म्हणाल्या, महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये एक हजार शिक्षक असून त्यांना ड्रेसकोड असावा, असा ठराव समितीने मंजूर केला आहे. हा ड्रेसकोड कसा असावा, त्यांचा रंग कसा असावा, याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर कार्यवाही केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील महापालिका शाळांच्या शिक्षकांनाही ड्रेसकोड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 12:56 PM
ड्रेसकोड कसा असावा, त्यांचा रंग कसा असावा, याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार
ठळक मुद्देमहापालिकेच्या ८७ प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये १९ , हिंदी विद्यालये २, उर्दू १४, इंग्रजी २