उद्योगनगरीला फ्लेक्समुळे बकालपणा, शहराच्या सौंदर्यीकरणास बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 02:10 AM2018-11-06T02:10:44+5:302018-11-06T02:11:13+5:30
पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून महापालिका प्रशासनाकडून वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र याचा खरेच फायदा होतो काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
रहाटणी - पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून महापालिका प्रशासनाकडून वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र याचा खरेच फायदा होतो काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत फ्लेक्स लावू नये व शहर विद्रूप करू नये असे न्यायालयाचे आदेश असताना, सर्वच नियम धाब्यावर बसवून राजकीय पदाधिकारी शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिरात फ्लेक्स लावत आहेत.
अनधिकृत फ्लेक्सकडे महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाचे दुर्लक्ष आहे. जाहिरात फलकाचा सांगाडा कोसळून पुणे शहरात चार जणांचा मृत्यू झाला. पिंपरी- चिंचवड महापालिका यातून बोध घेताना दिसून येत नाही. दिवाळीनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करीत आहेत. त्यासाठी फ्लेक्सचा वापर करण्यात येत आहे.
राजकीय पदाधिकारीही नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी फ्लेक्सचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र फ्लेक्स उभारल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहराच्या सौंदर्यास बाधा पोहचत असून, बकालपणा वाढत आहे.
रहाटणी, काळेवाडीत तर दीपावलीच्या शुभेच्छा फलक व बांधकाम व्यावसायिक यांच्या जाहिरातीच्या फ्लेक्सने कहर केला आहे. एका विद्युत खांबावर अनेक जाहिरात फ्लेक्स दिसून येत आहेत. काही ठिकाणच्या वळणावर तर वाहनचालकांना वळणावरून येणारे वाहनही दिसून येत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी अगदी रस्त्यावर फलक लावले आहेत. मात्र शासनाच्या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाचा संबंधित विभाग दुर्लक्ष का करीत आहे, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.
रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, वाकड, थेरगाव, पिंपरी गावठाण, पिंपळे गुरव, सांगवी यासह शहरातील अनेक परिसरात असे अनधिकृत फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. या फ्लेक्सवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.
जागा खरेदी- विक्री करणारे व्यावसायिकही मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करीत आहेत. शहरातील बड्या नेत्यांच्या आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे निकटवर्तीय असल्याचे या व्यावसायिकांकडून सांगण्यात येते. त्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायासंबंधीचे फलक मुख्य रस्ते, चौक आणि गल्लीबोळातही लावल्याचे दिसून येत आहेत. असे फलक बहुतांश अनधिकृत आहेत. असे असले, तरी आपले कोण काय करणार, असा या व्यावसायिकांचा आविर्भाव असतो. त्यामुळे जागा विक्री-खरेदीचे फ्लेक्स आणि छोटे फलक शहरभर लावण्यात आल्याचे दिसून येते. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवीन वर्षाचे शुभेच्छाफलक झळकले
काही मुरब्बी राजकारण्यांचे नवीन वर्षाचे शुभेच्छा फलक आतापासूनच लावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चौकांचा बकालपणा वाढत आहे. प्रभागातील कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याचा वाढदिवस असला, तरी विविध निवडणुकांसाठीचे इच्छुक उमेदवार आणि राजकीय पदाधिकारी त्यास वाढदिवस शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावत असल्याचे दिसून येते.
महापालिकेच्या अधिकाºयांवर दबाव?
रहाटणी चौक, नखाते वस्ती चौक, कोकणे चौक, शिवार चौक, तापकीरनगर, रहाटणी फाटा यासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावले जात आहेत. याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. या चौकातील फ्लेक्सवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. रहाटणी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या परिसरातही मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहे. त्यामुळे या पुतळा परिसराच्या सौंदर्यास बाधा पोहचत आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांचे पुतळा स्मारक या फ्लेक्समुळे झाकोळले आहे. अशा फ्लेक्सवर आणि जाहिरातबाजांवर कारवाई करण्याबाबत अधिकारी का धजावत नाहीत, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
अद्यापही दिसून येतात दस-याचे फलक
नखाते वस्ती चौकात एकावर एक फ्लेक्स लावण्याची स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसून येते. परिसरातील अनेक कॉलनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळही फ्लेक्सने मोठी जागा व्यापली आहे. विद्युत खांबांना, तसेच पथदिव्यांच्या खांबांनाही छोटे जाहिरातफलक लावण्यात येत आहेत. रहाटणी, काळेवाडी परिसरात नवरात्री आणि दसºयाच्या शुभेच्छांचे फलक अद्यापही दिसून येत आहेत.