जलवाहिनीच्या कामासाठी चांगल्या रस्त्याची केली खोदाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:48 AM2018-12-17T00:48:08+5:302018-12-17T00:49:12+5:30
लोणावळा नगरपरिषदेचा कारभार : पैशाचा अपव्यय होत असल्याची नगरसेविकेची तक्रार
लोणावळा : जुना खंडाळ्यातील अंध वृद्धाश्रम परिसरात लाखो रुपये खर्च करून लोणावळा नगर परिषदेने जेमतेम महिनाभरापूर्वी बनविलेला डांबरी रस्ता जलवाहिनी व वीजवाहिनीच्या कामासाठी दुतर्फा खोदाई करून खराब करण्यात आल्याने नगर परिषदेच्या लाखो रुपयांचा येथे चुराडा झाला असल्याचा आरोप या प्रभागातील नगरसेविका अंजना कडू यांनी केला आहे.
कडू म्हणाल्या, ‘‘कामाचे कसलेही नियोजन न करता लोणावळा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जुना खंडाळा भागात पहिले रस्ते बनविले. आता जलवाहिनी व वीजवाहिनी टाकण्याकरिता पुन्हा हेच रस्ते दोन्ही बाजूंनी खोदाई काम चालू केले आहे. मागील आठवड्यातच या रस्त्यावर सफेद रंगाचे पट्टे मारण्यात आले होते. ३० लाख रुपये खर्च करून बनवलेला हा रस्ता नागरिकांकरता औटघटकेचा ठरला आहे. या भागात जलवाहिनी व वीजवाहिनी टाकण्याकरिता खोदाईकाम करायचेच होते, तर मग नवीन रस्ता बनविण्याची घाई का केली? कामाचे नियोजन करून प्रथम जलवाहिनी व वीजवाहिनीसाठी खोदकाम झाल्यानंतर हे रस्ते डांबरीकरण केले असते तर नागरिकांच्या लाखो रुपयांचा चुराडा झाला नसता. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या पैशाच्या नुकसानीला जबाबदार असणाºयांवर कायदेशीर कारवाई करून तो खर्च त्यांच्याकडून वसुल करण्यात यावा अशी मागणी कडू यांनी केली आहे. अंजना कडू म्हणाल्या,‘‘ या रस्त्यासोबतच अपोलो गॅरेज रेल्वे गेट ते साधना कुटिर दरम्यान दोन कोटी रुपये खर्च करून मागील वर्षी रस्ता बनविण्यात आला. त्यावर नुकतेच विजेचे दिवे लावण्यात आले. आता त्याच ठिकाणाहून सदरची जलवाहिनी टाकली जाणार असल्याने त्या रस्त्याची वाट लागणार आहे. वर्षभरापासून लोणावळा शहरात अमृत योजनेमधून नवीन पाणी योजनेचे काम सुरु आहे. ज्या रस्त्याच्या बाजूने ही जलवाहिनी जाणार आहे. ते रस्ते जलवाहिनी टाकल्यानंतर बनविले असते, तर जनतेच्या पैशाची नासाडी झाली नसती. श् नुकसानीला जबाबदार असणाºयांवर कारवाई करत त्यांच्याकडून सदर रक्कम वसूल करावी, अशी मागणी पुणे जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासनाकडे करणार असल्याचे नगरसेविका कडू व बाळासाहेब कडू यांनी सांगितले.