पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वाहनतळ धोरण राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला येणार आहे. या धोरणास काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. गतवर्षी पाणीपट्टी, मिळकतदरात अन्यायकारक वाढ करून सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांवर छुपी करवाढ लादली. हे कमी म्हणून आता पार्किंग पॉलिसीच्या नावाखाली जीझिया कर वाहनधारकांकडून वसूल करण्यात येणार आहे, अशी टीका पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.साठे यांनी वाहनतळ धोरणाबाबत मत व्यक्त केले आहे. साठे म्हणाले, ‘‘चारचाकी वाहनासाठी वर्षाला नऊ हजारांहून जास्त कर आकारला जाणार आहे. ही रक्कम एखाद्या सदनिकेच्या किंवा व्यापारी, वाणिज्य गाळ्याच्या वार्षिक मिळकतीपेक्षा जास्त आहे. पुणे, मुंबई मनपाच्या धर्तीवर हा कर आकारला जाईल, असे सांगण्यात आले. परंतु या शहरातील नागरिकांना भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही.’’साठे म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकर रद्द करणे, बंद जलवाहिनीतून २४ तास मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा करणे, रोजगारात वाढ करणे, शहरातील गुन्हेगारीवर, वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय उभारणे, कचरा व्यवस्थापन करणे, नद्यांचे संवर्धन, महिला सक्षमीकरण करणे, ज्येष्ठांना सुविधा देणे, शहरातील क्रीडांगणे विकसित करणे, शहरात वायफाय सुविधा सुरू करणे, प्राधिकरणातील घरे फ्री होल्ड करणे, सुसज्ज मंडई उभारणे, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन व आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित भूखंड विकसित करणे, चाकणपर्यंत मेट्रो सुरू करणे, शहरात सरकारी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे अशी शेकडो आश्वासने भाजपाने निवडणुकीपूर्वी शहरवासीयांना दिली होती. जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. त्याला भुलून शहरातील मतदारांनी भाजपाला एकहाती सत्ता दिली.’’
वाहनतळ धोरणास वाढला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 6:26 AM