निविदेत रिंग झाल्याचे आयुक्तांना दिले पुरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:10 AM2017-12-28T01:10:58+5:302017-12-28T01:11:24+5:30
पिंपरी : महापालिकेच्या वतीने शाहूनगर येथील क्रीडांगणास सीमा भिंत बांधणे व इतर आनुषंगिक कामांची ई-निविदा कामांत आठपैकी पाच जणांना अपात्र ठरवून ठरावीक तीन ठेकेदारांना पात्र ठरविण्यात आले आहे.
पिंपरी : महापालिकेच्या वतीने शाहूनगर येथील क्रीडांगणास सीमा भिंत बांधणे व इतर आनुषंगिक कामांची ई-निविदा कामांत आठपैकी पाच जणांना अपात्र ठरवून ठरावीक तीन ठेकेदारांना पात्र ठरविण्यात आले आहे. पात्र झालेल्या तिघांनी एकाच संगणकावरून अनुक्रमे एक ते तीन टक्के जादा दराने संगनमत करून निविदा भरली आहे. त्यांचे एकाच क्रमांकाचे संगणक आयपी अॅड्रेसचे पुरावे आहेत. त्यामुळे फेरनिविदा काढण्याची मागणी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली. बहल यांनी कागदपत्रांचे पुरावे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.
शाहूनगर येथील क्रीडांगणास सीमा भिंत बांधणे व इतर आनुषंगिक कामांची ई-निविदा काढली. निविदा प्रक्रियेत रिंग झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बहल यांनी केला आहे. आठपैकी पाच जणांना अपात्र ठरवून ठरावीक तीन ठेकेदारांना पात्र ठरविले आहे. याबाबत आक्षेप नोंदविला होता. त्यावर ‘रिंग झाल्याचे मोघम बोलणे चुकीचे आहे. पुरावे द्या, कारवाई करतो, असे आश्वासन आयुक्त हर्डीकर यांनी दिले होते. त्यामुळे बहल यांनी माध्यमांना पुरावे दिले आहेत.
याबाबत माहिती देताना बहल म्हणाले, ‘‘पात्र तिन्ही ठेकेदारांनी एकाच संगणकावरून एकाच दिवशी व काही मिनिटांच्या अंतराने निविदा भरल्या आहेत. पात्र ठेकेदारांची काही कागदपत्रे गहाळ केली आहेत.’’
>प्रशासनावर ठपका : कागदपत्रे केली गहाळ
एखादा ठेकेदार एखादे कागदपत्र देण्यास चूक करू शकतो. परंतु पाच ठेकेदारांची कागदपत्रे याच निविदेमध्ये गहाळ कशी होतात? वरील सर्व ठेकेदार नियमानुसार सर्व निकषांमध्ये बसत असल्याने त्यांना निविदा की प्राप्त होती. पात्र तिन्ही ठेकेदारांची पात्रता तपासल्यास सदर निविदेच्या रकमेइतकी कामे केलेली नाहीत असा आरोप करत बहल म्हणाले की, भाजपा पदाधिकाºयांनी जाणीवपूर्वक पदाचा गैरावापर करून ही ‘रिंग’ केली आहे. या निविदेच्या स्पर्धेतील अपात्र ठरविलेललेल्या पाच ठेकेदारांचे पाकीट क्रमांक दोन उघडता येत नसल्यास त्यांच्या ठेकेदारांची निकोप स्पर्धा लक्षात येईल, असे बहल म्हणाले.