रिक्षाचालक ते पिंपरी चिंचवडचे मेयर; राहुल जाधवांचा टॉप गियर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 08:19 AM2018-08-06T08:19:48+5:302018-08-06T08:37:48+5:30
राहुल जाधव यांचा संघर्षपूर्ण 'प्रवास'
पिंपरी चिंचवड: कधीकाळी ज्या शहरात रिक्षा चालवली, काही वर्षांनी त्याच शहराचा महापौर होण्याचा मान राहुल जाधव यांनी मिळवला आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कथा पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव शब्दश: जगले आहेत. नुकत्याच झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवत महापौरपद मिळवलं. मात्र राहुल जाधव यांचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय अवघड होता.
शहराचे प्रथम नागरिक झालेल्या राहुल यांचा प्रवास आव्हानात्मक आणि खडतर होता. चिखली गावातील जाधववाडीमध्ये 36 वर्षांपूर्वी एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांना लहानपणापासूनच संकटांचा सामना करावा लागला. जाधव यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर आर्थिक कारणांमुळे त्यांना शिक्षण सोडावं लागलं. शिक्षण अर्धवट सोडल्यावर कुटुंबाचा आर्थिक भार वाहण्यासाठी त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. 1996 ते 2003 या काळात जाधव यांनी रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकला.
2006 हे वर्ष जाधव यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. 2006 पासून त्यांनी भाजपाचे नगरसेवक असलेल्या माऊली जाधव यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. 2017 मध्ये राहुल यांचं नाव महापौरपदाच्या शर्यतीत होतं. मात्र त्यावेळी नितीन काळजे महापौर झाले. मात्र यंदा राहुल जाधव यशस्वी झाले आणि ज्या शहरात कधी काळी रिक्षा चालवली, त्याच शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान त्यांनी मिळवला.