पिंपरी: सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत शिक्षिकेसह तिचा पती गंभीर जखमी झाले. त्यांच्या तेरा वर्षाच्या मुलासह शेजारच्या घरातील सहा वर्षाचा मुलगा किरकोळ जखमी झाले. या भीषण स्फोटाने शेजारील तीन घरांची दारे, खिडक्यांसह घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास भोसरी येथे घडली.भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा साळुंखे (वय ३५), त्याचे पती ज्ञानेश्वर साळुंखे (वय ४०), सिद्धेश साळुंखे (वय १३) शेजारी राहणारा श्रवण विनायक शिर्वेष्ठ (वय ६, सर्व रा. गुरूकृपा कॉलनी, दिघी रोड, सिद्धेश्वर शाळेजवळ, भोसरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. गुरूकृपा कॉलनीत मंगेश भिरूड यांची दोन मजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर एका खोलीत गेल्या १५ वर्षांपासून साळुंखे कुटूंब भाड्याने राहतात. मनीषा या दिघी रस्ता येथील श्रमजीवी विद्यालयात शिक्षिका आहेत. तर, ज्ञानेश्वर हे चाकण येथील एका कंपनीत नोकरी करतात. साळुंखे यांच्याकडे दोन सिलींडर आहेत. त्यापैकी एका सिलिंडरमधील गॅस संपल्याने साळुंखे यांनी मंगळवारी रात्रीच गॅस भरलेला सिलींडर शेगडीला जोडला. रात्री सिलींडरमधून गॅसगळती झाली. बुधवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर मनीषा यांनी गॅस सुरू करण्यासाठी लाईटरचा वापर केला. लाईटरने गॅस पेटवत असताना भडका होऊन स्फोट झाला. यामध्ये मनीषा, पती ज्ञानेश्वर गंभीररीत्या भाजले. तर, मुलगा सिद्धेश किरकोळ जखमी झाला. स्फोटाचा आवाज आणि प्रचंड हादऱ्याने आजुबाजूच्या नागरिकांमध्ये घबराट उडाली. सर्वजण घराबाहेर पळत सुटले. त्यानंतर साळुंखे यांच्या घरात गॅसगळतीमुळे स्फोट झाल्याची बाब उघड झाली.ऱ्या स्फोटाच्या हादऱ्याने साळुंखे यांच्यासह त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विनायक शिर्के यांच्या घराचा दरवाजा, खिडकीच्या काचा फुटल्या. एक काच उडून दिवाणवर झोपलेला विनायक यांचा मुलगा श्रवण यांच्या पोटात लागली. यात तो जखमी झाला. तसेच राजेश भिरूड आणि बालाजी मरडे यांच्या घराचाही दरवाजा, खिडकी, टीव्ही तसेच घरातील इतर साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच भोसरी अग्निशमन उपकेंद्राचे उपअधिकारी नामदेव शिंगाडे, विकास नाईक, विठ्ठल भुसे, कुंडलिक भुतापल्ले, सुरज गवळी, शांताराम घारे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. भोसरी पोलीसांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली.
भोसरीत गॅस गळतीमुळे स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांसह चारजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 4:29 PM
सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत शिक्षिकेसह तिचा पती गंभीर जखमी
ठळक मुद्देगॅस गळतीमुळे स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत शिक्षिकेसह तिचा पती गंभीर जखमी