स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ४ महिलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 11:17 AM2021-08-11T11:17:53+5:302021-08-11T11:18:00+5:30
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने पिंपळे सौदागर येथील मंत्रा स्पा सेंटर येथे सोमवारी ही कारवाई केली.
पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. पीडित चार महिलांची सुटका करून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने पिंपळे सौदागर येथील मंत्रा स्पा सेंटर येथे सोमवारी (दि. ९) सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई केली.
युवराज लहूराज शिंदे (वय २४), प्रकाश बापू पुरुंद (वय २६, दोन्ही रा. नेहरूनगर, पिंपरी), अशी आरोपींची नावे आहेत. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग समाधान सिसोदे यांनी या प्रकरणी मंगळवारी (दि. १०) सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील मंत्रा स्पा सेंटर येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी छापा टाकून या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. आरोपींनी पैशांचे आमिष दाखवून चार महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. पीडित चार महिलांची पोलिसांनी सुटका केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले पुढील तपास करीत आहेत.