पिंपरी : शासनाच्या आदेशनुसार पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा मिळकतकरासाठी स्वीकारण्यात येणार असून, येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत कराची रक्कम स्वीकारली जाणार आहे, अशी माहिती करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. केंद्र शासनाने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोंधळ उडाला होता. परंतु त्याचा फायदा घेत महापालिकेने मिळकत कर भरण्यासाठी जुन्या नोटा भरण्याची मुभा दिली. गेल्या सात दिवसांत २६.५० कोटी रुपये उत्पन्न पिंपरी-चिंचवड महापालिकेस मिळाले आहे. शहरातील १६ करसंकलन कार्यालये, क्षेत्रीय कार्यालयांत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तसेच आॅनलाइन कर भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. सोमवार ही शेवटची मुदत होती. ती मुदत आता गुरुवारपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी दोन दिवस कर भरण्याची संधी मिळणार आहे.आजपर्यंत १२ हजार मिळकतधारकांनी भरला कर चार दिवसांमध्ये १२ हजार ८६५ मिळकतधारकांनी २३.२९ कोटी रुपयांचा कर रोख भरला. तसेच धनादेश व आॅनलाइन पेमेंट गेट वेद्वारे ८४ लाख व ३३ लाख रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे. या वर्षी दोन लाख ५५ हजार ६५२ मिळकतधारकांनी एकूण २७४.६६ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. येत्या शुक्रवारपर्यंत मिळकत कर स्वीकारला जाणार असून, सकाळी नऊ ते रात्री बारा या वेळेत कराची रक्कम नागरिकांना भरता येणार आहे, असे दिलीप गावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मिळकतकरासाठी गुरुवारपर्यंत मुदतवाढ
By admin | Published: November 16, 2016 2:39 AM