उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष दारू विक्रेत्यांचे उजाडतेय भाग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 02:46 AM2018-12-15T02:46:04+5:302018-12-15T02:46:26+5:30
विक्रेते म्हणतात, स्थानिक पोलीस घेतात महिन्याला पंधरा हजार
कामशेत : मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. इंद्रायणी नदी अथवा पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी रोज हजारो लिटर गावठी दारूची निर्मिती होत असून, ती परिसरात ठिकठिकाणी विक्री केली जात आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस पाटील आदींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य उत्पादनशुल्क विभाग दोन तालुके असून, त्यानुसार मनुष्यबळ नसल्याचे कारण देत आहे; तर स्थानिक पोलीस प्रशासन या हातभट्ट्यांवर कारवाईचा फार्स करीत आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा या हातभट्ट्या सुरू होत असल्याने त्यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नाणे मावळातील साई-नाणोली, उंबरवाडी, पाथरगाव, पिंपळोली यांच्यासह लोणावळा ग्रामीण व कामशेत पोलीस ठाणे यांच्या समांतर हद्दीत व इतरत्र मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारू बनवणे व विक्री जोरात सुरू आहे. तसेच ही गावठी दारू इंद्रायणी नदीकडेला वर्दळ नसलेल्या सुनसान भागात बनवली जाते व ठरावीक ठिकाणी त्याची विक्री होते.
कामशेत पोलिसांनी मागील महिन्यात मंगळवार (दि. २७) सायंकाळी पाचच्या सुमारास पाथरगाव-ताजे गावाच्या मध्यावर जुन्या पुणे-मुंबई महामार्ग व रेल्वे ट्रकच्या जवळ असलेल्या एका गावठी हातभट्टीवर धडक कारवाई केली. हातभट्टीची विल्हेवाट लावली होती. या वेळी इंद्रायणी नदीच्या झाडीत मुकेश नानावत हा दररोज शेकडो लिटर दारुची निर्मिती करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत नानावत पोलिसांच्या हाती लागला नाही. ग्रामीण भागातील पोलीस पाटील हे पद नावापुरते राहिले असून, नवनिर्वाचित पोलीस पाटलांना आपल्या कर्त्यव्याची वा अधिकाराची क्षुल्लकसुद्धा माहिती नाही.
ताजे येथील एका दारू विक्री करणाºयाने पोलिसांना दर महिना पंधरा हजार रुपये हप्ता असल्याची धक्कादायक माहिती व्हायरल केली होती. शिवाय मागील वेळी आमच्यावर कारवाई केली ती फक्त पैसे वाढवण्यासाठी होती. हे पण सांगितल्याने सामान्य नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास उडू लागला आहे. ग्रामीण भागातील या अवैध दारूभट्ट्यांमुळे स्थानिकांना विशेष करून महिलांना मोठा त्रास होत आहे. तसेच या परिसरातून महिला व मुलींना येता-जाता काही विपरीत घटना घडल्यास कोणाला जबाबदार धरावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक पोलीस पाटील व ग्रामपंचायत मात्र मूग गिळून गप्प आहे.
तक्रारी आल्यास कारवाई करणार
बेकायदा दारूविक्री व गावठी दारूभट्ट्यांवर आमच्या विभागाची कारवाई सुरू असून, आमच्या विभागात फक्त सहा ते सात जण असून, दोन तालुके असल्याने कारवाईस विलंब होतो आहे. मनुष्यबळ कमी असल्याने सर्व ठिकाणी पोहचता येत नाही. नागरिकांच्या तक्रारी आल्यास तातडीने कारवाई करणार आहे.
- राजाराम खोत, पोलीस निरीक्षक, राज्य उत्पादनशुल्क विभाग
अशा प्रकारे अवैध दारूविक्री व बनवणे ही माहिती आम्हाला कळल्यानंतर आम्ही कडक कारवाई करीत आहे. तसेच असे अवैध धंदे सुरू असतील, तर त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात येईल.
- ज्ञानेश्वर शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी