शिरूर : गेल्या चार महिन्यांपासून केंद्रात आलेल्या मोदी सरकारच्या अनेक निर्णयांमुळे शेतकरी अडचणीत आले असून, ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी नकारात्मक विचारणा करणाऱ्यांनी आपल्या लगत असणाऱ्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये येऊन पाहावे, असे प्रतिपादन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले. शिरूर येथील पाचकंदीलचौक भागात राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. अशोक पवार यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. या वेळी बोलताना त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार तसेच भाजपा-शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर त्यांनी तुफानी हल्ला चढविला. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या बद्दल भाजपा व शिवसेना यांच्यामध्ये चाललेल्या वाक्युद्धाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, छत्रपती ही प्रॉपर्टी नाही तो एक विचार आहे. त्यांची एक आदर्श राज्यप्रणाली होती. मात्र, केवळ मतांसाठी आणि खंडणीसाठी महाराजांच्या नावाचा वापर करणाऱ्यांनी महाराज समजून घेतले. पाहिजे. महाराष्ट्रात येऊन अमित शहासारख्या व्यक्ती महाराष्ट्राच्या असुरक्षितेबद्दल बोलतात. मात्र त्यांनी गुजरातमध्ये काय चाललेय, तेथे महिला किती सुरक्षित आहेत, याचा विचार करावा. भाजपा-शिवसेनेला केंद्रात एकत्र सत्ता चालते, मुंबई-ठाण्यामधील महानगरपालिकेत युती चालते. मग, विधानसभेच्या निवडणुकीतच नेमके काय झाले? माझ्या मते खंडणीच्या वाटणीवरूनच त्यांची युती तुटली असावी. गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्या दूरदर्शीपणामुळे महाराष्ट्राचा चौफेर विकास झाला असताना, मोदी विकासाच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. शिरूर-हवेलीचे आमदार अॅड. अशोक पवार यांनी आपल्या कार्यपद्धतीने शिरूर शहराचा तसेच संपूर्ण मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे. आणखी विकासकामांसाठी अशोक पवार यांना पुन्हा एकदा संधी द्यावी. यावेळी विकास लवांडे, लोचन शिवले, पांडुरंग थोरात, सुनीता काळेवार, शेखर पाचुंदकर यांचीही भाषणे झाली. पोपटराव गावडे, प्रदीप कंद, सिद्धार्थ कदम, सुनीता कालेवार, उज्ज्वला बरमेचा, वर्षा शिवले, राजेंद्र कोरेकर, संतोष भंडारी, वसंत कोरेकर, जालिंदर कामठे, नितीन पवार, राजेश खराडे, जगदाळे आदी उपस्थित होते. जाकीर पठाण यांनी स्वागत, तर संतोष भंडारी यांनी आभार मानले.
केंद्रामुळे शेतकरी अडचणीत : सुळे
By admin | Published: October 11, 2014 6:55 AM