सराईताकडून पंधरा गुन्हे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:23 AM2018-08-18T00:23:43+5:302018-08-18T00:24:04+5:30
पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्या तीन सराईत आरोपींकडून तब्बल ७ लाख ५३ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे पिंपरी, निगडी, लोणी काळभोर, कुर्डुवाडी, भोसरी, हिंजवडी या पोलीस ठाण्यातील एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पिंपरी - पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्या तीन सराईत आरोपींकडून तब्बल ७ लाख ५३ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे पिंपरी, निगडी, लोणी काळभोर, कुर्डुवाडी, भोसरी, हिंजवडी या पोलीस ठाण्यातील एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
नीलेश मनोहर गायकवाड (वय २८, रा. विद्यानगर बस स्टॉपच्या मागे, चिंचवड), शंकर मधुकर पवार (वय १९, रा. निराधारनगर झोपडपट्टी, पिंपरी. मूळ रा. पिनोर, ता. मोहोळ), समीर मुख्तार शेख (वय २४, रा. आंबेडकर कॉलनी, सरकारी दवाखान्याजवळ, उरुळी कांचन, ता. हवेली) आणि विकास दिलीप कांबळे (वय २६, रा. पत्राशेड, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सहायक आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई रोहित पिंजरकर यांना नीलेश गायकवाड परशुराम चौक,
विद्यानगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे
चौकशी केली असता सात मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून सात दुचाकी जप्त केल्या. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील सहा आणि निगडी ठाण्यातील एक असे सात वाहनचोरीचे गुन्हे उघड झाले.
पोलीस हवालदार राजेंद्र भोसले यांना माहिती मिळाली की, शंकर आणि समीर हे दोघे पिंपरीतील साई चौकाजवळील भुयारी मार्गात
येणार आहेत. त्यानुसार तपास पथकातील पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण आठ मोटारसायकल, एक एलईडी टीव्ही, एक डीव्हीडी असा ४ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील चार, लोणी काळभोर, कुर्डुवाडी, भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण आठ गुन्हे उघड झाले आहेत.
पोलीस शिपाई उमेश वानखडे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास भटनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विकास आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे. एक लोखंडी कोयता आणि दुचाकी असा एकूण ७६ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक विठ्ठल बढे यांच्या पथकाने केली.