Pune: उतारवयासाठी महिलेला वेबसाईटवर जोडीदार शोधणे पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 01:05 PM2021-12-06T13:05:03+5:302021-12-06T13:10:06+5:30
पिंपरी: पतीचे निधन झाले. दोन मुलींपैकी एकीचे लग्न झाले. दुसऱ्या मुलीसाठी वर संशोधन सुरू असतानाच महिलेने स्वत:साठीही जोडीदार शोधायला ...
पिंपरी: पतीचे निधन झाले. दोन मुलींपैकी एकीचे लग्न झाले. दुसऱ्या मुलीसाठी वर संशोधन सुरू असतानाच महिलेने स्वत:साठीही जोडीदार शोधायला सुरुवात केली. त्यासाठी मेट्रोमनी वेबसाईटवर नावनोंदणी केली. त्यावरून एका व्यक्तीशी ओळख झाली. त्याने विश्वास संपादन करून आयुष्यभर साथ निभावण्याच्या आणाभाका घेतल्या. त्यातून मदत म्हणून महिलेकडून सव्वाचार लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने घेतले. त्यानंतर तिला प्रतिसाद न देता फसवणूक केली.
उतारवयात मानसिक आधार देणारा, समजून घेणारा, मन मोकळं करता यावे, असा कुणीतरी जोडीदार असावा, अशी अपेक्षा प्रत्येकाची असू शकते. याच भावनेने शहरातील एका ५५ वर्षीय महिलेने लग्न करण्याचे ठरविले. मात्र तिच्या भावनांशी खेळत एकाने तिचा विश्वासघात केला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, परराज्यातील एक उच्चशिक्षित महिला तिच्या कुटुंबासह रावेत परिसरात वास्तव्यास आली. पतीचे निधन झाले. उच्चशिक्षित असल्याने तिने खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी केली. दोन मुलींचा उत्तम प्रकारे सांभाळ केला. त्यातील मोठ्या मुलीचे लग्न झाले. दुसऱ्या मुलीसाठी वर संशोधन सुरू झाले. दरम्यान, दुसरी मुलगीही लग्न होऊन तिच्या सासरी जाणार आणि आपण एकटेच राहणार, या विचाराने महिला अस्वस्थ होत असे. त्यावर उपाय म्हणून महिलेनेदेखील लग्न करण्याचे ठरविले. मात्र उतारवयात लग्न करण्याचा विचार मुलींना तसेच नातेवाईकांना पटणार नाही, असे वाटल्याने महिलेने त्याबाबत कुणालाही सांगितले नाही.
मेट्रोमनी वेबसाईटवर नावनोंदणी केली. त्यावरून एका पुरुषाने तिला रिक्वेस्ट पाठविली. महिला व त्याच्यात फोनवरून बोलणे सुरू झाले. व्हिडिओ काॅलदेखील झाले. मी एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक म्हणून दिल्ली येथे नोकरी करतो, असे त्याने महिलेला सांगितले. महिलेचा विश्वास संपादन केला. मला पैशांची खूप गरज आहे, लगेच परत करतो, असे म्हणून त्याने महिलेकडून सव्वाचार लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यास सांगून घेतले. त्यानंतर महिलेला प्रतिसाद देणे टाळले.