पिंपरी :चिंचवड गाव येथील महापालिकेच्या तालेरा रूग्णालयाला शनिवारी ( दि. २१ ) दुपारी चार वाजताच्या दरम्यान आग लागली आहे. आग लागताच अग्नीशामन विभागाला त्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे वेळेतच आग नियंत्रणात आली. यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. या परिसरातील विज पुरवठा सकाळापासून खंडीत झाला होता. त्यामुळे रूग्णालयातील विद्युत यंत्रणा बॅटरीच्या साह्याने सुरू होती. यामुळे बॅटरीवर ताण आला आणि शॉर्ट सर्किट झाले. यातून आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
प्रसूती झालेल्या पाच महिला रूग्णालयात दाखल होत्या. त्वरीत त्यांना बाहेर काढून त्यांना थेरगाव रूग्णालयात दाखल करण्यात आले. आग लागली तेव्हा काही जण लसीकरणासाठी रूग्णालयात आले होते. रूग्णालयातील कर्मचारी आणि लस घेण्यासाठी आलेले नागरिक बाहेर आले. अचानक आग लागल्यामुळे रूग्णालयात आणि आजूबाजूच्या परिसरात गोंधळ उडाला. बॅटरी बॅकअप रूम मधील सगळ्या बॅटऱ्या जळाल्या आहेत. आगीमुळे आजूबाजूच्या परीसरात धूर पसरला. अग्नीशामन विभागाचे कर्मचाऱ्यांनी जळालेल्या सगळ्या बॅटऱ्या आणि इतर साहित्य बाहेर काढले.
अनर्थ टळला ?तालेरा रूग्णालयात शनिवार हा सुट्टीच्या दिवस असल्यामुळे रूग्णांची गर्दी नव्हती. तलेच प्रसूती झालेल्या काही महिलांना सकाळीच सुट्टी देण्यात आली होती, अशी माहिती आहे. आग लागली तेव्हा प्रसूती झालेल्या पाच महिला रूग्णालयात दाखल होत्या. खबरदारी म्हणून त्यांना त्वरीत थेरगाव रूग्णालयात दाखल करण्यात आले. बॅटरी बॅक रूम तळ मजल्यावर आहे. त्यामुळे आग लवकर नियंत्रण आली आणि संपूर्ण रूग्णालयात आग पसरली नाही. त्यामुळे अनर्थ टळला.
तालेरा रूग्णालयातील बॅटरी बॅक अप रूमला दुपारच्या वेळी अचानक लागली. रूग्णालयात प्रसूती झालेल्या पाच महिला दाखल होत्या. त्यांना त्वरीत थेरगाव रूग्णालयात दाखल करण्यात आले. कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य, वैद्यकीय अधिकारी, महापालिका
आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशमन विभागाचे तीन बंब घटना स्थळी दाखल झाले. दहा ते पंधरा मिनीटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. खबदरारी म्हणून तीन बंब पाठविण्यात आले होते. परंतु एका अर्धा बंबातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.-किरण गावडे, मुख्य अग्नीशमन अधिकारी