खडकी : खडकीत दुचाकी जाळल्याची घटना घडल्यानंतर पाथरकर चाळ येथील अनेक लोकांनी खडकी बोर्डाच्या अग्निशामक दलाला फोनवरून माहिती देण्यासाठी प्रयत्न केला. परंतु बोर्डाच्या अग्निशामक दलातर्फे कोणीही फोन घेतला नाही. त्यामुळे बोर्डाच्या अग्निशामक दलाचा उपयोग काय, असा प्रश्न बोर्डाचे अग्निशामक दल प्रमुख बी. एस. नाईक यांना विचारला असता, ‘कदाचित फोनमध्ये खराबी असू शकते. तसेच रात्रीच्या पाळीतील कर्मचाऱ्यांना विचारून बघतो,’ अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.
येथील पाथरकर चाळमधील भर वस्तीत पहाटे साडेतीन ते पावणेचारच्या दरम्यान अज्ञातांकडून वस्तीत लावलेल्या दुचाक्या जाळण्यात आल्या. त्यात १३ दुचाकी खाक झाल्या. शेजारी उभ्या दुचाक्यांनाही आगीची झळ लागल्यामुळे इतर दहा ते पंधरा दुचाक्यांचे नुकसान झाले. वस्तीमधील तरुणांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाला फोन केला असता, काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तरुणांनी वस्तीमधील घरासमोर असलेल्या पाण्याच्या ड्रममधून पाणी आणून आगीवर नियंत्रण आणले. सुदैवाने जीवितहानी टळली.खडकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांची गस्त खडकीत न होणे हे एक कारणही या गोष्टीस कारणीभूत ठरत आहे. खडकीत पोलीस गस्त मारत नाही, अशी तक्रार खडकीकरांनी केली आहे.