पिंपरी : महापालिकेच्या वतीने खराळवाडी, पिंपरी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक आणि मध्यवर्ती ग्रंथालयाची इमारत बांधून तयार आहे. त्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील काही प्रशासकीय कार्यालयांचे स्थलांतर करण्याचा घाट घातला आहे. ही बाब शहरातील विविध संघटनांनी निदर्शनास आणून दिली. स्मारकात कार्यालये सुरू करण्यास कडाडून विरोध झाला. त्यामुळे महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि अधिकाºयांनी सोमवारी स्मारकास भेट दिली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात २००९ मध्ये पिंपरी येथील महात्मा फुले पूर्णाकृती पुतळ्याजवळील मोकळ्या जागेत इमारत बांधून तेथे सावित्रीबाई फुले मध्यवर्ती ग्रंथालय आणि स्मारक बांधण्याचा निर्णय झाला होता. त्या ठिकाणी मध्यवर्ती ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा केंद्र, संदर्भ ग्रंथ, सावित्रीबाई फुले यांचे स्मारक, सांस्कृतिक सभागृह आदींचे नियोजन करण्यात आले होते. तशीच इमारतीची रचना केली गेली आहे. मात्र, काहींनी या प्रकल्पात महापालिकेतील शिक्षण समिती, आकाशचिन्ह परवाना, एलबीटी, कायदा विभाग, तसेच नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील क्रीडा विभागाचे कार्यालय तेथे सुरू करण्याचे नियोजन केले. हालचालींना वेगही दिला. सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाºयांची ही त्यास मूक संमती मिळाली. ही बाब वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील विविध सामाजिक संस्था तसेच, ज्येष्ठ नागरिक संघाने २५ आॅक्टोबर २०१७ ला महापालिकेस पत्र देऊन दिले. ज्या उद्देशाने प्रकल्पाची उभारणी केली, त्याच उद्देशाने प्रकल्प उपयोगात आणला पाहिजे. अशी मागणी होऊ लागली. राष्टÑवादीसह शहरातील विविध संस्थांकडून आक्षेप घेतला गेल्याने तोडगा काय काढता येईल, यासाठी महापौर काळजे व सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी सदर इमारतीची सोमवारी सायंकाळी पाहणी केली. त्यांच्यासमेवत अधिकारीही उपस्थित होते.आयुक्त करणार संघटनांशी चर्चाया जागेत मध्यवर्ती ग्रंथालय आणि विविध विभागाचे कार्यालय सुरू करण्याबाबत महापालिकेचे प्रयत्न आहेत. इमारत मोठी असून, त्या ठिकाणी वाचनालयासह महापालिकेची इतर कार्यालये सुरू करता येतील. त्या दृष्टीने पाहणी करण्यात आली आहे. या विषयावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबतही चर्चा झाली आहे. संघटना व संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे महापौर काळजे व सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी सांगितले.
स्मारकाच्या ठिकाणी कार्यालयाचा घाट; ग्रंथालय व वाचनालयाचे नियोजन बदलण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 4:19 AM