पिंपरी : केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या शालेय पोषण आहार या उपक्रमातून पिंपरी-चिंचवड शहरातील २७३ शाळांतील ९७ हजार विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर दरमहा ४ लाख ४३ हजार ५४० एवढा खर्च होत आहे. प्राथमिक शिक्षणातील मुलांचा शाळेतील सहभाग वाढावा, उपस्थिती वाढावी, तसेच आरोग्यपूरक आहार मुलांना मिळावा, या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारचा सयुक्तिक असा शालेय पोषण आहार हा उपक्रम सुरू केला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातही हा उपक्रम राबविला आहे. याअंतर्गत मुलांच्या वयानुसार मुलांना पोषक आहार दिला जातो. या अनुषंगाने पहिली ते पाचवीच्या एका विद्यार्थ्यामागे ३ रुपये ८६ पैसे व शंभर ग्रॅम तांदूळ व सहावी ते आठवीच्या एका विद्यार्थ्यामागे ५ रुपये ७८ पैसे, दीडशे ग्रॅम तांदूळ असा खर्च केला जात आहे. महापालिकेस मुलांच्या वयोमानानुसार, त्यांच्या गरजेनुसार आवश्यक अशा पौष्टिक पदार्थांचे प्रमाण दिले आहे. त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीस १०० ग्रॅम तांदूळ, २० ग्रॅम डाळ, कडधान्य , ५० ग्रॅम भाजीपाला, ५ ग्रॅम तेल, २ ते ५ ग्रॅम मसाला, ४५० उष्मांक , १२ प्रोटिन , २५० ते २७५ ग्रॅम वजन एवढे, तर इयत्ता ६वी ते ८वी १५० ग्रॅम तांदूळ, डाळ, कडधान्य ३० ग्रॅम, ७५ ग्रॅम भाजीपाला ७.५ ग्रॅम तेल, ३ ते ७ ग्रॅम मसाला , ७०० ग्रॅम उष्मांक, २० प्रोटिन , ३७५ ते ४०० ग्रॅम वजन आदी नमूद केलेले आहे. एवढेच नव्हे, तर शासनाकडून आठवड्यातील सहा वारनिहाय पोषक आहाराच्या वर्गवारीचा तक्ताही पोषण आहार खात्याकडे देण्यात आला आाहे. यामध्ये सोमवारी कडधान्य - मोड आलेली मटकी, मूग, हरभरा यांपैकी एकाची उसळ, आमटी भात, मंगळवारी पुलाव भात, इडली चटणी, मसाला इडली यापैकी एक, बुधवारी डाळ-मूगडाळ, तूरडाळ, मसूरडाळ यापैकी एकची आमटी भात, गुरुवारी खिचडी-मूगडाळ, मसूरडाळ, तूरडाळ यापैकी एक, शुक्रवारी कडधान्य मोड आलेली मटकी, चवळी, वाटाणा यापैकी एकाची उसळ, आमटी भात, शनिवारी तूरडाळ, सांबर भात, गोड भात, मसाला भात हा आहार देणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त मुलांना आठवड्यातून एक दिवस पूरक आहार देणे अनिवार्य आहे. म्हणजेच प्रती मुलामागे २ रुपये ५० पैसे या मूल्यात येणारे बिस्किट, राजिगरा लाडू, मुरमुरे, खजूर व खारीक आदी पोषक पदार्थ मुलांना देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
आहारावर साडेचार लाख खर्च
By admin | Published: August 31, 2016 12:57 AM