वडगाव शहरात एका रात्रीत सात घरफाेड्या ; परिसरात घबराट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 05:50 PM2019-12-24T17:50:47+5:302019-12-24T17:53:29+5:30
वडगाव शहरात एकाच रात्री सात घरफाेड्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. सीसीटिव्हीच्या माध्यमातून चाेरट्यांचा शाेध घेण्यात येत आहे.
वडगाव मावळ : वडगाव शहरात एका रात्रीत सात घराफाेड्या झाल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक शहरात रात्री पाेलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी करत आहेत. विशेष म्हणजे चाेरट्यांनी घरफाेडी करताना एका घरातील लाडूंवर देखील ताव मारला आहे.
वडगाव शहरात सोमवारी रात्री ह.भ.प.दतात्रय टेमघरे हे कुटूबीयांसह घरात झोपले असताना त्याच्या घराला बाहेरून कडी लावून त्याचे पहिल्या मजल्यावरचे बंद घराचा कडी कोयंडा कापुन बॅगेतील तीन सोनाच्या अंगठ्या व दहा हजार रुपये रोख नेले. प्रदीप प्रभाकर बवरे हे बाहेरगावी गेले होते. त्याच्या घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून कपाट फोडुन त्यातील चांदीची भांडी व १५ हजार रोख रक्कम नेली. विशेष म्हणजे हिवाळा असल्याने बवरे यांनी स्वत:ला खाण्यासाठी लाडु आणले होते. ते सर्व लाडु खावुन चोरट्यांनी ऐवज नेला. चिंचेच्या गणपतीजवळ चालवत असलेले पाहुणाचार हॉटेलचे चालक सोमनाथ महादु डांगरे यांचे बंद घराचे कुलुप तोडून एक तोळ्याचे मंगळसुत्र व ५ हजार रुपये रोख व लहान मुलासाठी आणलेली खेळणी नेली. नंदा बवरे यांचे घरफोडून चाेरट्यांनी घरात शोधाशोध केली, मात्र काहीच हाती लागले नाही. सचिन देशमुख यांचे घरफोडून रोख रक्कम व मोबाईल नेला. भाऊ रायकर याचे व अन्य काही जणांचे घरफोडण्याचा प्रयत्न झाला. एकाच रात्री सात घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर व हवालदार रविराज पाटोळे यांनी भेट देऊन पाहणी केली. येथील अॅड. रविंद्र बवरे यांच्याकडे असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता तीन व्यक्ती आत दिसुल आल्या आहेत.