पिंपरीत तलवारीचा धाक दाखवून पळविली चारचाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 04:03 PM2019-12-23T16:03:13+5:302019-12-23T20:22:37+5:30
उद्योगनगरीत वाहनचोरीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. वाहनचोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून येते. तलवारीचा धाक दाखवून चारचाकी वाहन पळवून नेल्याची घटना थरमॅक्स चौकात घडली आहे.
पिंपरी : उद्योगनगरीत वाहनचोरीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. वाहनचोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून येते. तलवारीचा धाक दाखवून चारचाकी वाहन पळवून नेल्याची घटना थरमॅक्स चौकात घडली आहे. तसेच शहर परिसरातून चार दुचाकींची चोरी झाली आहे. चार लाखांची पाच वाहने चोरी झाल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये रविवारी (दि. 22) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहनचोरीच्या या प्रकारांमुळे वाहनचालक व मालकांमध्ये घबराट आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन लाख रुपये किमतीच्या चारचाकी वाहन चोरीचा प्रकार थरमॅक्स चौकात रविवारी (दि. 22) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला. याप्रकरणी शिवाजी आप्पासाहेब देवकाते (वय 29, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जबरी चोरी केल्याप्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी देवकाते त्यांच्या चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला पार्क करून वाहनात झोपले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी देवकाते यांना शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तलवारीचा धाक दाखवून देवकाते यांचे चारचाकी वाहन पळवून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
वाहन चोरीचा दुसरा प्रकार विजयनगर, काळेवाडी येथे 16 डिसेंबर रोजी घडला. याप्रकरणी चेतन दिलीप पाटील (वय 23, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 50 हजारांची दुचाकी त्यांच्या घरासमोर लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
वाहन चोरीचा तिसरा प्रकार वाकड येथे बुधवारी (दि. 18) रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी श्रीशैल नागनाथ कोळी (वय 24, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कोळी यांनी त्यांची 28 हजार रुपये किमतीची दुचाकी दुकानाबाहेरील जागेत पार्क केली होती. त्यानंतर फिर्यादी कोळी स्वयंपाक करण्याच्या गडबडीत होते. जेवण झाल्यानंतर मित्र राजकुमार प्रकाश मेहेत्रे याला रात्री दुकानात झोपण्याचे सांगून फिर्यादी कोळी रात्री साडेअकराच्या सुमारास घरी जाण्यासाठि निघाले. त्यावेळी दुकानाबाहेर त्यांची दुचाकी दुकानाबाहेर दिसून आली नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
वाहन चोरीचा चौथा प्रकार चिचवड येथे शुक्रवारी (दि. 20) रात्री 11 ते शनिवारी (दि. 21) पहाटे पाचच्या दरम्यान घडला. याप्रकरणी सुमित राजू कांबळे (वय 27, रा. चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कांबळे यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी राहत्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुराची दुचाकी पळविली
रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुराची दुचाकी चोरी करून नेल्याचा प्रकार चाकण ते तळेगाव रस्त्यावरील वाघजाईनगरच्या हद्दीत मंगळवारी (दि. 17) रात्री 9 ते बुधवारी (दि. 18) सकाळी सहाच्या दरम्यान घडला. याप्रकरणी लतीफ बालमभाई पठाण (वय 30, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पठाण बिगारी असून, मजुरीचे काम करतात. ते मंगळवारी रात्री वाघजाईनगरच्या हद्दीतील फोर्जिंग कंपनीजवळ रस्त्याच्या कडेला झोपले होते. त्यावेळी त्यांनी तेथे त्यांची 11 हजार रुपये किमतीची दुचाकी पार्क केलेली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.