पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे छोट्या आजारासाठी वैद्यकीय सल्ला घ्यायचा असेल तर कुठे जायचे असा अनेकांना प्रश्न असतो. पण पुण्यातल्या एका डॉक्टरने हा प्रश्न सोडवला असून त्यांनी ऑनलाईन कन्सल्टिंग सुरु केले आहे आणि तेही अगदी मोफत.
पुण्यातील हिंजवडी भागात डॉ आदेश काळे यांचे संजीवनी हॉस्पिटल आहे. ते जनरल फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करतात. कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यावर पेशंटशी संवाद कसा ठेवायचा असा प्रश्न त्यांना पडला होता. अर्थात नियमित असणारे पेशंट तर फोनवरून जोडता येणे शक्य होते मात्र इतर पेशंट, ज्यांना वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे त्यांच्यासाठी काहीतरी माध्यम तयार करण्याची डॉ काळे यांची इच्छा होती.हा विचार करून त्यांनी https://forms.gle/wW3jsiEGJCULS4y9A अशी गुगल लिंक तयार केली आहे. त्यांच्या या ऑनलाईन कन्सल्टिंगला किती प्रतिसाद मिळेल अशी साशंकता त्यांनाही होती मात्र आता पुणेच नाही तर सातारा, सांगली आणि राज्याबाहेरील भागातले रुग्णही कन्सल्टिंग करत आहेत. दिवसभरात मिळून सुमारे ३० पेक्षा जास्त रुग्ण ते तपासतात.
याबाबत माहिती देताना डॉ काळे लोकमत'ला म्हणाले की, 'लोकांना अनेकदा त्वचा रोग, अंगदुखी, डोकेदुखी, एखाद्या अंगाला सूज येणे असे त्यामानाने साधे आजार असतात. सध्या अशा छोट्या छोट्या पण त्रासदायक गोष्टींसाठी डॉक्टरांकडे जाणे सहज शक्य नाही. त्यामुळे आमच्या लिंकवर नाव, संपर्क लिहून आजार, त्याची लक्षणे, आवश्यकता वाटल्यास फोटो जोडण्याची सोय आहे. आमच्याकडे त्यांचे ऍप्लिकेशन आल्यावर आम्ही ते वाचतो, काही प्रश्न असल्यास त्यांना फोन करतो आणि मगच इ-प्रिस्क्रिप्शन पाठवतो. सर्वच आजारांवर दूरवरून उपचार सांगणे शक्य नाही. उदा. छातीत डाव्या बाजूला दुखण्यासारखी लक्षणे असल्यास आम्ही त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतो. या निमीत्ताने कमीत कमी लोक बाहेर पडले तर कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल इतकाच आमचा हेतू आहे'. डॉ काळे यांच्या इ- आरोग्यसेवेच्या मार्गाचे सर्वत्र कौतुक होत असून 'इच्छा तेथे मार्ग' हे वचन या धन्वंतरीचे प्रत्यक्षात आणले आहे.