चिखलीत स्थानिकांकडून शुक्रवारपासून तीन दिवस 'बंद'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:05 PM2020-04-07T17:05:02+5:302020-04-07T17:07:23+5:30
पिंपरी - चिंचवड शहरात कोरोनाग्रस्त व संशयित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत
पिंपरी : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे चिखली गाव तीन दिवस बंद राहणार आहे. स्थानिकांकडून शुक्रवार (दि. १० ते १२ )एप्रिल रविवार दरम्यान हा बंद पाळण्यात येणार आहे. रुग्णालये तसेच औषध विक्रीची दुकाने खुली राहणार असून इतर सर्व दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्यात यावीत, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे. चिखली येथील स्थानिक नागरिकांनी याबाबत ठराव केला आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. कुदळवाडी, पवार वस्ती, घरकुल, आळंदी रोड आणि परिसरात पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय चिखलीकरांनी घेतलेला आहे. सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिकांनी केले आहे.माजी महापौर राहुल जाधव, दत्ता साने, संजय नेवाळे, कुंदन गायकवाड, सुरेश म्हेत्रे, संतोष मोरे, दिनेश यादव, अमृत सोनवणे, संगीता ताम्हाणे आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत.दरम्यान, पिंपरी - चिंचवड शहरात कोरोनाग्रस्त व संशयित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. तसेच पुण्यात मृतांचा आकडा वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सर्व यंत्रणा करीत आहेत. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरत असलेल्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.