पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील फरार आरोपीला निगडीत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 09:27 PM2020-12-05T21:27:17+5:302020-12-05T21:28:04+5:30
ओटास्किम, निगडी परिसरातील गुन्हेगार १२ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री नाशिक फाटा येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.
पिंपरी : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पोलिसांनीअटक केली. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ओटास्किम, निगडी येथे शुक्रवारी ही कारवाई केली. सचिन गुलाब जाधव (वय २०, रा. ओटास्किम, निगडी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जाकीर उर्फ डॅनी कय्युम पठाण, ऋतिक अनिल सकट, आकाश गोरख धुनगाव, विजय उर्फ गुंड्या निळकंठ शिंदे, असे यापूर्वी अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी रमेश साबुलाल मावसकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
ओटास्किम, निगडी परिसरातील गुन्हेगार १२ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री नाशिक फाटा येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यासाठी लोखंडी कोयते, पालगन, लोखंडी रॉँड, नायलॉन रस्सी, अशा साहित्याची त्यांनी जमवाजमव केली होती. दरोड्याच्या तयारी असलेले हे आरोपी निगडी पोलीस ठाण्याच्या रात्र गस्तीवरील पथकाला मिळून आले होते.
निगडी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. मात्र आरोपी सचिन जाधव हा पळून गेला होता. गुन्हे थाखा युनिट दोनकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. पोलीस कर्मचारी जयवंत राऊत, नामदेव राऊत व अजित सानप यांना आरोपी सचिन जाधव याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे थाखा युनिट दोनच्या पथकाने एकता चौक, ओटा स्किम परिसरातून सापळा लावून आरोपी सचिन जाधव याला ताब्यात घेतले. त्याला निगडी पोलीस ठाण्यात हजर केले.
गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस कर्मचारी शिवानंद स्वामी, दीपक खरात, केराप्पा माने, प्रमोद वेताळ, वसंत खोगणे, उषा दळे, दिलीप चौधरी, विपुल जाधव, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, नामदेव राऊत, अजित सानप, शिवाजी मुंढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.