पिंपरी : मानसिक संतुलन बिघडलेल्या महिलेचा मृतदेह चिंचवडला थेरगाव घाटालगत नदीपात्रात आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन करून पोलिसांनी देखील तपास सुरू केला. अखेर तिच्या घराचा शोध लागला. मात्र मुलबाळ नसल्याने ती एकटीच रहात असल्याची माहितीसमोर आली. वेडाच्या भरात पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यानंतर तिच्या मावशीच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनीच महिलेवर अंत्यसंस्कार केले.शोभा सुभाष टेके (वय ५५, रा. चिंचवडे नगर, चिंचवड) असे मृत महिलेचे नाव आहे. शोभा टेके या गेल्या काही वर्षांपासून चिंचवडे नगर येथे राहूल भोईर यांच्या चाळीत भाडेतत्वावरील घरात राहण्यास होती. शोभा लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. तसेच १५ वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. मूलबाळ नसल्याने त्या एकट्याच रहात होत्या. मात्र त्यांची मावशी त्यांच्या घरी येत असे. गेल्या काही दिवसांपासून शोभा यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यामुळे सतत बाहेर फिरत असत. दरम्यान शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराजवळ थेरगाव घाटाच्या लगत एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यांनी अग्निशामक दलाला याबाबत कळविले. त्यानुसार अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर महापालिकेच्या पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. तसेच महिलेच्या नातेवाईकांचा चिंचवड परिसरात शोध घेण्यात आला. त्यांच्या घराचा शोध लागला. तो मृतदेह शोभा टेके यांचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांना मूलबाळ नसल्याने इतर नातेवाईकांचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना मावशी असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या मावशीला बोलावून घेऊन मृतदेहाची ओळख करून घेतली. शोभा टेके यांचा मृतदेह असल्याचे मावशीने सांगितले. वेडाच्या भरात पाण्यात पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असेही मावशीने सांगितले. त्यानंतर मृतदेह मावशीच्या ताब्यात देण्यात आला. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही नातेवाईक नसल्याने अंत्यसंस्कार करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र पानसरे यांनी काही सामाजिक कार्यकत्यांच्या मदतीने लिंक रोड, चिंचवड येथील स्मशानभूमीत मावशीच्या उपस्थितीत शोभा टेके यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी केले ' त्या 'महिलेवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 8:09 PM
गेल्या काही दिवसांपासून शोभा यांचे मानसिक संतुलन बिघडले होते...
ठळक मुद्देचिंचवड येथे नदीपात्रात सापडला होता मृतदेह