पुणे : विधानसभा निवडणुकीच्या जिल्ह्यातील २१ जागांसाठी बुधवारी (दि.१५) मतदान होत असून, रिंगणातील ३०८ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतपेटीत बंद होणार आहे. आघाडी युती तुटल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. मतांच्या ध्रुवीकरणामुळे प्रत्येकालाच थोड्या फरकाने का होईना विजयाची आशा वाटत आहे. त्यामुळे उमेदवारांनीही अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी यंत्रणा उभारली आहे. बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून, सायंकाळी सहा वाजेपर्यंत रांगेत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदार जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृतीसाठी मतदार दिवस, मतदार रथ, पथनाट्य, जाहिराती अशा विविध माध्यमांचा उपयोग केला आहे. जिल्ह्यात ६९ लाख २७ हजार ३७९ मतदार असून, यातील किती मतदार या आवाहनाला प्रतिसाद देतात, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान, मतदान केंद्रांवरील नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारी (दि. १४) तिसरे प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच, मतदारसंघनिहाय निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी सौरभ राव व निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक प्रक्रिया कामकाजाची पाहणी केली. निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण एलईडी स्क्रीनवर देण्यात आले. मतदारसंघनिहाय वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, मोबाईल टॉयलेट व्हॅन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पोलीस व कर्मचाऱ्यांच्या पथकासाठी वाहतूक सुविधा करणे, तसेच मतदारांच्या नावांची संगणकीय यादी सहायक मतदार केंद्रात उपलब्ध करून देणे, शिल्लक फोटो व्होटर स्लिप वितरित करणे, सर्च इंजिनची सुविधा देणे, मायक्रोआॅब्झर्वर, व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्यांच्या नेमणुका अशी विविध प्रशासकीय कामे मंगळवारी आटोपण्यात आली. (प्रतिनिधी)
भवितव्य आज होणार मतपेटीत बंद!
By admin | Published: October 15, 2014 5:08 AM