पिंपरी : शहरात वाहन चोरी, मोबाईल, चेनचोरी, घरफोडी सोबतच सराफी दुकाने फोडणारी टोळी देखील सक्रिय झाली आहे. चोरट्यांनी मागील पाच दिवसात तीन सराफी दुकाने फोडून दुकानातून मोठ्या प्रमाणात दागिने आणि रोकड चोरून नेली आहे. संक्रातीच्या दिवशी दोन तर त्यानंतर तीन दिवसांनी आणखी एक दुकान फोडले आहे.पहिल्या घटनेत प्रवीण रामचंद्र देवकर (वय 36, रा. कस्पटेवस्ती, वाकड) यांचे कस्पटेवस्ती वाकड येथे कनक नावाने सराफी दुकान आहे. बुधवारी (दि. 15) रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, कटावणीने चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश करीत सोन्या- चांदीचे दागिने, रोख रक्कम असा 19 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरटयांनी सीसीटीव्हीच्या डीव्हीआर देखील चोरून नेला.दुसऱ्या घटनेत मनोहर पुनसिंग चौहान (वय 30, रा. नखातेवस्ती, रहाटणी) यांचे रहाटणी येथील सिंहगड कॉलनीमध्ये ह्यअंबिका ज्वेलर्सह्ण हे सराफी दुकान आहे. गुरुवारी पहाटे दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आतील 2 लाख 40 हजार रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने चोरून नेले.तिस-या घटनेत चौधरी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांचे बिजलीनगर चिंचवड येथील गुरुद्वारा चौकात ह्यबालाजी ज्वेलर्सह्ण हे दुकान आहे. रविवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून 10 तोळे सोने, 50 किलो चांदी आणि 66 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सकाळी दुकान उघडण्याच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला आहे.वारंवार घडणा-या या सराफी दुकानांमधील चो-यांमुळे सराफी व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील वर्षी रहाटणी येथे सराफी व्यावसायिकावर गोळीबार करून लाखो रुपयांचे सोने चोरट्यांनी चोरून नेले होते. त्यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, मात्र त्या गुन्ह्याच्या तळाशी अजूनही पोलीस पोहोचलेले नाहीत. पाच दिवसांच्या कालावधीत तीन दुकाने फोडल्याने सराफी दुकाने फोडणारी टोळी शहरात सक्रिय झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सराफी दुकाने फोडणारी टोळी शहरात सक्रिय; पाच दिवसात तीन दुकाने फोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 6:51 PM
मोठ्या प्रमाणात दागिने आणि रोकड नेली चोरून
ठळक मुद्देसंक्रातीच्या दिवशी दोन तर त्यानंतर तीन दिवसांनी आणखी एक फोडले दुकान