पिंपरी : साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीने लग्न करावे, यासाठी तरुणाने धमकी देऊन तिचे अपहरण केले. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली. हिंजवडी येथे २१ डिसेंबर रोजी ही घटना घडली.
याप्रकरणी इंजिनिअर तरुणीने सांगली पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार दाखल करण्यात आलेला गुन्हा रविवारी (दि. २४) हिंजवडी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी नीलेश तुकाराम बुरुटे (रा. शेगाव, ता. जत, सांगली) याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेशचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तरुणी साॅफ्टवेअर इंजिनिअर असून, हिंजवडी आयटी पार्कमधील नामांकित कंपनीत नोकरीला आहे. नीलेश बुरुटे तरुणीला भेटला. ‘तू माझ्याशी लग्न कर नाही तर मी तुझे फोटो व्हायरल करेन व घरच्यांनाही सांगेन’, अशी धमकी त्याने तिला दिली. त्यानंतर त्याने तिला त्याच्या खोलीवर नेले होते. तेथेही लग्नासाठी जबरदस्ती केली. यावेळी तिने त्याला समजून सांगितले. परंतु त्यानंतरही त्याने तिला गाडीत बसवले व गावी घेऊन गेला. तेथे त्याने तिला घरामध्ये डांबून ठेवले. याप्रकरणी तरुणीने सांगली पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार तक्रार दाखल करून हिंजवडी पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला. पोलिस उपनिरीक्षक अजित काकडे तपास करीत आहेत.