दोन महिन्यांमध्ये नोंदणी करून मतदार व्हा
By admin | Published: August 31, 2016 01:04 AM2016-08-31T01:04:37+5:302016-08-31T01:04:37+5:30
महापालिका निवडणूकीसाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी तीन विधानसभा मतदार संघाचा भाग येतो. तसेच मुळशी तालुक्याचाही काही भाग या शहरात येतो.
मतदार नोंदणीबद्दल सांगा.
- महापालिका निवडणूकीसाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी तीन विधानसभा मतदार संघाचा भाग येतो. तसेच मुळशी तालुक्याचाही काही भाग या शहरात येतो. निरंतर मतदार नोंदणीचे काम सुरू असते. मात्र, महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने मतदार नोंदणीसाठी सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ जानेवारी २०१६ रोजी १८ वर्ष पूर्ण होणाऱ्यांना यादीत समाविष्ट केले जाणार आहे. तसेच मतदार यादीत नावे समाविष्ठ करण्यासाठी शहरातील १६ महाविद्यालयांमध्ये समन्वयकांची नियुक्ती केली आहे. २०१२ च्या निवडणूकीमध्ये ११ लाख ५२ हजार मतदार होते. मात्र, मतदार याद्यांची दुरूस्ती मोहीमेमुळे मतदार संख्या कमी झाली आहे.
मतदारांची संख्या घटली आहे?
-गेल्या महापालिका निवडणूकीत साडेअकरा लाख मतदार होते. मात्र, मतदार याद्यांची दुरूस्ती करण्यात आली. दुबार, स्थलांतरित , मृत व्यक्तीची नावे तपासली. याद्या दुरूस्त केल्या. त्यातून चिंचवडमधून ८० हजार ७०१, पिंपरीतून ८४ हजार ९४३, भोसरीतून ४२ हजार ७४२ मतदार वगळण्यात आले. सुमारे सव्वा दोन लाख मतदार वगळल्याने आता ती संख्या १० लाख ६८ हजार ३७१ वर आली आहे. १६ जानेवारी २०१६ रोजी अपडेट केलेल्या याद्यांमुळे शहरातील मतदार संख्या ११ लाख ३ हजार ३७२ झाली आहे. जानेवारीपासून आणि आत्तापर्यंत आणि येत्या दोन महिन्यात नवीन मतदार नोंदणी होणार आहे. त्यामुळे साडेतेरा लाखापर्यंत मतदार होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे मतदार संख्या घटलेली नाही.
प्रभाग रचनेबद्दल सांगा?
-महापालिका निवडणूक ही २०११ च्या जनगणेनुसार होणार असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे. शहरात ३१०२ जनगणनेचे प्रगणक गट होते. हेच गट गुगल अर्थच्या नकाशावर बसवून प्रारूप प्रभाग रचना तयार केली जाणार आहे.
प्रारूप प्रभाग रचना तयार करून संबंधित प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहिर होईल, त्यानंतर आरक्षणांची सोडत काढण्यात येणार आहे. मतदार याद्यांचे शुद्धीकरण हेही काम एका बाजूला सुरू राहणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या शेवटी महापालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होणार आहे.
मतदार केंद्र आणि नियोजन काय?
-महापालिकेची होणारी निवडणूक चारसदस्यीय पद्धतीने असल्याने ३२ प्रभाग असणार आहेत.एका मतदारास अनेक मते देण्यासाठी लागणारा वेळ याचा विचार करता, एका मतदान केंद्रास ७०० मतदार जोडल्यास मतदार प्रक्रिया सुरळीत होईल, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रस्तावित केले आहे. बहुसदस्यीय पद्धतीमुळे एका मतदान केंद्रावरील मतदार संख्या कमी केल्यामुळे शहरातील एकुण मतदार केंद्रामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे १९५० मतदान केंद्र तयार करावी लागणार आहेत. त्याचे नियोजन केले असून कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले आहे.
अभियानाबद्दल सांगा?
-मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार जागृती अभियान राबविले आहे. नागरिकांना देण्यात येणाऱ्या पाणीबीलांसोबत सुमारे सहा लाख पत्रके वाटण्यात आली. तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांत मतदार साह्यता केंद्र सुरू केले आहे. महाविद्यालयांमध्येही मतदार नोंदणीची सुविधा केली आहे.
- शब्दांकन : विश्वास मोरे