पिंपरी : व्यावसायिक भागीदारीचा हिस्सा काढून घेण्याचे सांगून ४५ लाख रुपये दिले नाहीत. तसेच जिममधून मिळणाऱ्या नफ्यातून कर्जाचे हफ्ते न भरता आर्थिक फसवणूक केली. पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक येथे नोव्हेंबर २०१८ ते दि.१७ डिसेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दीपक अनिल शेट (वय 42, रा. कॅम्प, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजीव सुरेश कदम (वय 73, रा. संगमवाडी, खडकी, पुणे), नीलेश शंकर वाडेकर (रा. रविवार पेठ, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शेट यांची पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकात तळवळकर जिम असून, त्यामधून तुझा हिस्सा काढून घे, आम्ही तुला तुझ्या हिस्स्याचे ४५ लाख रुपये देतो, तू जिममधून बाहेर पड, असे सांगून, आरोपींनी फिर्यादी शेट यांना त्यांचे पैसे दिले नाहीत. तसेच जिममधील मेंबरकडून येणारी फिची रक्कम बँकेच्या दुसऱ्या खात्यावर जमा केली. जिममधून येणाऱ्या नफ्यातून कर्जाचे हफ्ते न फेडता फियार्दी शेट यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.