पिंपरी : वीस वर्षांपूर्वी तयार केलेल्या शहर विकासाच्या आराखड्यांवर आत्ता काम करत आहोत. प्रत्येक काम वेळच्या वेळी झाले असते तर ही दुर्भाग्यपूर्ण वेळ आज आलीच नसती. यासाठी प्रशासकीय अधिका-यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, अशी टीका आमदार महेश लांडगे यांनी केली.
चिखली, मोशी परिसरातील रहिवासी सोसायट्यांमधील नागरिकांना येणा-या समस्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपुढे मांडण्यासाठी चिखली मोशी हाउसिंग फेडरेशनच्या वतीने संवादाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी या भागातील महापालिका, पोलीस, वीज वितरण, सोसायट्यांच्या तक्रारी यांसारख्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.आमदार लांडगे म्हणाले, ‘‘सध्या आम्ही पुढील अनेक वर्षांचे नियोजन करीत आहोत. जाधववाडी, चिखली, मोशी, तळवडे या भागातील नागरिकांसाठी तीनशे एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील अनेक वर्ष पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल. भामा-आसखेड धरणग्रस्तांना योग्य वेळी त्यांच्या जमिनींचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे ते शेतकरी त्या धरणातून पाणी उचलण्यासाठी विरोध करीत आहेत. या विरोधामुळे त्या धरणातून पाणी आणण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्या शेतक-यांना वेळीच मोबदला मिळाला असता तर आज विलंबाची ही वेळ आली नसती. पण त्यातूनही मार्ग काढत ज्याप्रमाणे पवना धरणाचे पाणी रावेत येथून उचलण्यात येते, त्याप्रमाणे भामा-आसखेड धरणाचे पाणी देहूरोड येथून उचलण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या मोहक जाहिराती पाहून नागरिकांनी फसू नये.’’४वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर म्हणाले, ‘‘काही ठिकाणी रस्त्यावर दारू पिणारे नागरिक आढळून येत आहेत. त्यासाठी रिव्हर रेसिडेन्सी, मायमर सोसायटी यांसारख्या आतल्या सोसायट्यांपर्यंत पोलीस गस्त सुरु करण्यात येणार आहे. सोसायट्यांमध्ये तक्रार पेट्यांची संकल्पना राबविण्यात येत असून, त्यालादेखील नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन समस्यांसाठी आवाज उठवायला हवा.’’