वाहनासाठी माहेरून पैसे आणण्यास सांगून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 11:48 PM2021-04-20T23:48:36+5:302021-04-20T23:48:53+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेचे पती नोकरीसाठी बाहेर गेले असताना सासरच्या लोक विवाहितेला वाळीत टाकल्यासारखे त्यांच्याशी वागत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : चारचाकी गाडी घेण्यासाठी वडिलांकडून १२ लाख रुपये, तसेच प्रत्येक सणासुदीला माहेरहून सोन्याचा दागिना घेऊन ये, अशी मागणी विवाहितेकडे केली. याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ जानेवारी २०१५ ते १९ एप्रिल २०२१ या कालावधित घडली.
याप्रकरणी पीडित २४ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती दयानंद विष्णू बोबडे (वय ३४), सासरे विष्णू अर्जुन बोबडे (वय ५८), सासू शोभा विष्णू बोबडे (वय ५३), दीर तात्यासाहेब विष्णू बोबडे (वय ३२), जाऊ मोनाली तात्यासाहेब बोबडे (वय २१, सर्व रा. नेवरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेचे पती नोकरीसाठी बाहेर गेले असताना सासरच्या लोक विवाहितेला वाळीत टाकल्यासारखे त्यांच्याशी वागत होते. विनाकारण विवाहितेला घालून पाडून बोलून तसेच शारीरिक व मानसिक त्रास देऊन क्रूरतेची वागणूक दिली. मला चारचाकी गाडी घ्यायची आहे. तर तू तुझ्या वडिलांकडून १२ लाख रुपये घेऊन ये, असा दम देत पतीने विवाहितेला मारहाण केली. तसेच प्रत्येक सणासुदीला काहीतरी सोन्याचा दागिना घेऊन ये, असे म्हणून दमदाटी करीत असे.