पिंपरी : आतापर्यंत विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. शहरातील झोपडपट्टी दादा, भाई यांना आदर्श मानून त्यांच्या पावलांवर पाऊल टाकणा-या मुलांमधून अल्पवयीन गुन्हेगार तयार होत आहेत. टवाळखोरी, छेडछाड आणि लुटमार अशा कृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलांचा सहभाग अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. अल्पवयीन आरोपींवर कारवाई करण्यास मर्यादा येतात. नेमका याच परिस्थितीचा बालगुन्हेगार फायदा उठवू लागल्याने पोलीस हतबलता व्यक्त करीत आहेत.परिसरात स्थानिक गुंडांची दहशत असते़ त्यामुळे अवतीभोवती वावरणारी अल्पवयीन मुले त्यांच्या दहशतीने प्रभावित होतात. गुन्हेगारी प्रवृत्तींच्या नादी लागल्याने कमी वयात ते व्यसनाकडे वळतात. कधी व्यसनासाठी तर कधी चैन, मौज मजेसाठी त्यांना पैशांची गरज भासते. ऐश करण्याची सवय लागल्याने पैसे मिळविण्यासाठी अल्पवयीन मुले सुरुवातीला छोट्या चोºयांतून गुन्हेगारीकडे वाटचाल करतात.- आजूबाजूची परिस्थिती अल्पवयीन मुलांना बिघडविण्यास कारणीभूत ठरते. मुलांचे चुकीच्या दिशेने पाऊल पडू नये, याची दक्षता घेण्याची जबाबदारी खरे तर पालकांवर आहे. पालकांनी वेळीच लक्ष दिले तर अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील सहभाग नियंत्रणात आणला जाऊ शकतो, असे नागरिकांचे मत आहे.
अल्पवयीन आरोपी पोलिसांची डोकेदुखी, गुन्ह्यांमध्ये मुलांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 3:19 AM