पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा कर्मचारी सर्वेक्षण करीत आहेत. त्यांना कोणतीही सुरक्षेची साधने दिली नाहीत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. आशा कर्मचाऱ्यांना पीपीई किट, सॅनिटायझर, साबण व मास्क यांसारखे साहित्यही उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांकडून होत आहे.पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा १२ मार्चला पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी युद्धपातळीवर जिवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करीत आहेत. कोरोनाविषयी सर्वेक्षण करणे आशा कर्मचाऱ्यांना तसेच आरोग्य योध्यांना महापालिकेकडून विमा संरक्षण, मानधन, प्रोत्साहान भत्ता द्यावा,अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांबरोबर केंद्र व राज्य सरकारकडून नियुक्ती होणाऱ्या आशा कर्मचारी यांना देखील सर्वेक्षणाची जबाबदारी दिली आहे. परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचे विमा संरक्षण अथवा एकत्रित मानधन वा भत्ता दिला जात नाही, अशा सेविकांना महापालिकेकडून प्रोत्साहनपर भत्ते, वेतन तसेच विम्याचे संरक्षण तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.मानधन मिळेना वेळेवरआरोग्य अभियानांतर्गत आशा सेविका या शहरातील बालमृत्यू रोखणे, गर्भवती मातांचा मृत्युदर कमी करणे, विविध आजारांचे रुग्ण शोधणे व त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच रुग्णालयात पोहोचविण्याचे काम करत होत्या. मात्र, कोरोनाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी आशा सेविकांवर सोपविली आहे. या सेविकांना केंद्र व राज्य शासनाकडून मानधन दिले जाते. या सेविकांना सध्या वेतन मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. सध्या या सेविका आपला जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम करत आहेत.
महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी युद्धपातळीवर जिवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करीत आहेत. यांच्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मर्यादित राहिली आहे. यात अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय व इतर कर्मचारी वर्ग, मनपाचे सर्वेक्षणातील कर्मचाऱ्यांचा तसेच पोलीस या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. आपला जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढा देणाऱ्या व शहरातील नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण तसेच पगार, मानधन इत्यादी देण्यात आलेले आहे. - नाना काटे