पुण्यात गारांसह मुसळधार पाऊस
By admin | Published: October 8, 2014 05:18 AM2014-10-08T05:18:33+5:302014-10-08T05:18:33+5:30
शहराच्या काही भागात आज दुपारी गारांसह मुसळधार पाऊस झाला. अंदमानात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, बिहारमधून परतलेला मॉन्सून आणि स्थानिक वातावरणातील बदलांमुळे हा पाऊस झाला
पुणे : शहराच्या काही भागात आज दुपारी गारांसह मुसळधार पाऊस झाला. अंदमानात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, बिहारमधून परतलेला मॉन्सून आणि स्थानिक वातावरणातील बदलांमुळे हा पाऊस झाला. येत्या दोन दिवसांत दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आली आहे.
शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र, ‘आॅक्टोबर हिट’च्या उन्हाच्या झळा तीव्रपणे जाणवत होत्या. तीनच्या सुमारास आकाशात ढगांनी दाटी केली. शहराच्या काही भागात दुपारी तीन वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. अर्धा ते पाऊण तासाच्या या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. कसबा, शुक्रवार पेठेत काही ठिकाणी गारा पडल्या. पाऊस थांबल्यानंतर वातावरण पूर्ववत झाले आणि लख्ख ऊन पडले होते. राज्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात दापोली ४ मिमी, सावंतवाडी ३ मिमी, तर मध्य महाराष्ट्रात आजरा ३, सोलापूर, सिन्नर याठिकाणी एक मिमी पावसाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
परतीचा मॉन्सून सुरू असला, तरी महाबळेश्वर वगळता तापमान सरासरीपर्यंत स्थिरावत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळाही तीव्र आहेत. महाबळेश्वरमध्ये आज २६.३३ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यातील काही शहरांच्या तापमानाची नोंद पुढीलप्रमाणे झाली. पुणे - ३२.९, जळगाव-३६.४, कोल्हापूर - ३३.१, मालेगाव - ३६, नाशिक -३१.९, सांगली - ३२.४, सोलापूर - ३४.३, औरंगाबाद - ३५.२, नागपूर ३३.१.