पत्नीला मेसेज केला म्हणून पतीने केला स्केटिंग प्रशिक्षकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 07:10 PM2019-12-06T19:10:36+5:302019-12-06T19:11:19+5:30
स्केटिंगपटू निलेश नाईक याच्या खुनाची उकल करण्यात पाेलिसांना यश आले आहे. पत्नीला मेसेज केल्याच्या रागातून आराेपीने निलेश याचा खुन केला असल्याचे समाेर आले आहे.
पिंपरी : धारदार हत्याराने वार करून स्केटिंग प्रशिक्षकाचा खून करण्यात आल्याप्रकरणी आरोपीला २४ तासांच्या आत पाेलिसांनी जेरबंद केले आहे. बुधवारी (दि. ४) सकाळी नऊच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे येथे खुनाचा हा प्रकार उघडकीस आला होता. पत्नीला मेसेज केला म्हणून आरोपीने स्केटिंग प्रशिक्षकाला दारू पाजून त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल ज्ञानोबा मानमोडे (रा. सूसगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. तर निलेश शिवाजी नाईक (वय २४, रा. सूसगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे खून झालेल्या स्केटिंग प्रशिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी मयत नीलेश यांचे मामा कपिल भुपाल नाईक (वय ३४, रा. सूसगाव, ता. मुळशी,) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
मयत नीलेश नाईक व आरोपी विठ्ठल मानमोडे हे दोघे एकाच बिल्डींगमध्ये राहत होते. त्यामुळे दोघे एकमेकांना ओळखत होते. स्केटिंगपटू असलेल्या नीलेश याने आरोपी मानमोडे याच्या बायकोला मेसेज केला. त्यामुळे आरोपी मानमोडे याला राग आला. त्यातून चिडून जाऊन त्याने मंगळवारी (दि. ३) रात्री नीलेश याला जांबे येथे मोकळ्या मैदानात घेऊन जाऊन दारू पाजली. त्यानंतर धारदार हत्याराने त्याच्या मानेवर, गळ्यावर व डोक्यात वार करून त्याला जबर जखमी करून त्याचा खून केला. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
आरोपी मानमोडे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात एक व वडगाव मावळ पोलीस ठाण्यात एक असे दोन गुन्हे दाखल आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे तपास करीत आहेत.
अशी झाली गुन्ह्याची उकल
आरोपी विठ्ठल मानमोडे याच्यासोबत बाहेर जात असल्याचे मयत नीलेश याने त्याचा मामा फिर्यादी कपिल नाईक याला सांगितले होते. तसेच आरोपी मानमोडे हा त्याच्या दुचाकीवरून नीलेश याला जांबे येथील मोकळ्या मैदानात घेऊन गेला. दारू पाजून नीलेश याचा तेथे खून केला. त्यानंतर घटनास्थळी दुचाकी सोडून आरोपी मानमोडे तेथून पसार झाला. त्या दुचाकीमालकाचा शोध घेतला असता मानमोडे याचे नाव समोर आले. मानमोडे याच्याबाबत माहिती घेतली असता तो त्याच्या घरी नसून पसार झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर तांत्रिक तपासावरून तो मुंबईत एका हॉटेलात असल्याचे निष्पन्न झाले. तेथून त्याला जेरबंद करण्यात आले.