पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये टीडीआर घोटाळा झाल्याचे अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडले. त्याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह या बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतली. त्याबाबतचे अनेक कागदपत्रे विविध अधिकाऱ्यांना दाखवले. त्यामध्ये आयुक्त सिंह नाही म्हणत असले तरी शंका घेण्यासाठी जागा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकडमधील आरक्षित भूखंड खासगी विकसकाला विकसित करण्यासाठी देऊन शासकीय नियमांची पायमल्ली करत यामध्ये दीड हजार कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा करण्यात आला. याबाबत हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा झाली. त्याबाबत विचारले असता अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यात आला. मात्र, त्यावेळी अधिवेशानामध्ये असल्याने जास्त माहिती घेता आली नाही. त्यानंतर मी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून माहिती घेतली आहे. तसेच त्या संदर्भातील अनेक कागदपत्रे मागवले. त्यानंतर नगरविकास सचिवांशी बोललो. तसेच अनेक अधिकाऱ्यांना ही कागदपत्रे दाखवली. त्यातील बहुतांश अधिकाऱ्यांनी सांगितले की आयुक्त नाही म्हणत असले तरी यामध्ये शंका घ्यायला जागा आहे. त्यामुळे मी मुंबईला जाऊन पुन्हा या प्रकरणाची सखोली चौकशी करणार आहे. तसेच राज्य सरकारला हा निर्णय थांबवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे याची शहानिशा केली जाईल. त्यामध्ये काही गडबड असेल तर निर्णयाला स्थगिती दिली जाईल. काही गडबड नसेल तर थांबवण्याचा प्रश्न येत नाही, असेही पवार यांनी सांगितले.
मी जे बोलतो ते करतोच...कोल्हेंना पाडणारच-
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा करणार. या निवडणुकीत आमचा उमेदवार आम्ही निवडून आणूच. अमोल कोल्हे यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यांना तिकीट कोणामुळे मिळाले? हे विचारा. तसेच निवडून आल्यानंतर दीड महिन्यामध्ये ते राजीनामा द्यायला निघाले होते. गेल्या पाच वर्षात ते मतदारसंघात दिसले नाही. त्यामुळे त्यांचेच मन त्यांना खायला लागले आहे. मात्र, शिरूर लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार उभा करणार आणि तो निवडून आणणार. मी जे बोलतो ते करतोच त्यामुळे अमोल कोल्हे यांचा पराभव करणारच असे अजित पवार यांनी सांगितले.