- रोशन मोरे
पिंपरी : विमा कंपनीच्या एजंटने जयंत कुलकर्णी (बदललेले नाव) या ज्येष्ठ नागरिकाला फोन केला. विमा काढला तर तो तुम्हाला कसा फायद्याचा आहे असे सांगून तब्बल १२ लाख रुपयांचा विमा काढण्यास जयंत यांना भाग पाडले. जयंत यांची मुलगी आयटीत काम करत असल्याने तिने देखील विमा काढण्यास पैसे दिले. त्यामुळे जयंत कुलकर्णी यांनी तब्बल १२ लाख रुपयांचा विमा ऑनलाईन काढला; मात्र एजंटने फोनवरून या विम्यातून जो फायदा होईल असे सांगितले होते. तसेच जे रिटर्न मिळतील असे आश्वासन दिले होते. ते तसे वास्तवात मिळत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जयंत यांनी तत्काळ पोलिस आयुक्तालयातील सायबर कक्षाकडे धाव घेतली.
सायबर कक्षातील पोलिस अंमलदार कृष्णा गवई यांनी सांगितले की, तक्रार येताच वरिष्ठांनी याची दखल घेत संबंधित विमा कंपनीकडे मेलच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या. या मेलमधून ही कृती कशी चुकीची आहे आणि यातून ज्येष्ठाची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यासोबतच जवळ जवळ ९० टक्के रक्कम पुन्हा ज्येष्ठ नागरिकाला मिळवून देण्यात यश आले.
आश्वासनांवर विश्वास ठेवू नका
फोनद्वारे विविध योजना सांगून त्याद्वारे फायदा होतो, असे सांगून अनेकदा फसवणूक केली जाते. ज्या योजनेची माहिती देऊन पैसे घेतले जातात त्या योजनेमध्ये सांगितलेले फायदे त्या योजनेतून मिळत नाही, असे अनेकदा होते. त्यामुळे फोनवरून अवास्तव फायदा मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये.
दिलेल्या माहितीची खातरजमा करा
विमा विकण्यासाठी फोनवरून बोलणारे एजंट हे तुम्ही विमा घेतला तर कसा फायदा मिळेल याची माहिती देतात. त्यासोबतच त्यातून मिळणारे फायदे कसे जास्त आहे, याची आकडेवारी फुगवून देखील सांगतात. त्यामुळे तुम्हाला एजंट जी माहिती देतो आहे, ती माहिती क्रॉस चेक करून आपली खातरजमा करूनच पुढचे पाऊल उचला.
विमा घेताना जर ऑनलाईन फसवणूक झाली. अशावेळी संबंधित व्यक्तीने वेळेत सायबर कक्षाकडे तक्रार केली तर संबंधित व्यक्तीला लगेच पैसे परत मिळवून देण्यासाठी कारवाई केली जाते.
- संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल