इंद्रायणीत बुडून युवक झाला बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:36 AM2017-07-30T03:36:36+5:302017-07-30T03:36:36+5:30
वर्षाविहारासाठी मित्रांसमवेत आलेला महाविद्यालयीन युवक कुंडमळा (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीपात्रात बुडून बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.
तळेगाव दाभाडे : वर्षाविहारासाठी मित्रांसमवेत आलेला महाविद्यालयीन युवक कुंडमळा (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीपात्रात बुडून बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.
अतुल दशरथ पाटील (वय २५, रा. धलीगाव, ता. पारगाव, जि. जळगाव) असे नदीपात्रात बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरफच्या जवानांना पाचारण करण्यात आले. मात्र, अंधारामुळे शोध मोहीम थांबवावी लागली. रविवारी सकाळी ही शोध मोहीम पुन्हा सुरू ठेवण्यात येणार आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग आकुर्डी (पुणे) येथील अभियांत्रिकी शाखेचे ९ विद्यार्थी वर्षाविहारासाठी इंद्रायणी नदीपात्राच्या कुंडमळा (इंदोरी, ता. मावळ) येथे आले होते. त्यातील अतुल पाटीलचा पाय घसरून तो नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहात पडला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार, उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांच्या पथकाने धाव घेतली. अतुल हा इंजिनिअरिंगच्या दुसºया वर्षात शिकत आहे. पर्यटकांनी जबाबदारने वर्षाविहाराचा आनंद लुटावा. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन देहूरोड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत माडगुळकर यांनी केले आहे.
खड्यातील पाण्यात पडून दोन बालिकांचा मृत्यू
पिंपरी : जाधववाडी येथील उद्यानात असलेल्या खड्यातील पाण्यात पडून दोन बालिकांचा मृत्यू झाला. ही घटना चिखली, जाधववाडी येथे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम जयराम गजबन्सी (वय ७), प्रियान्शू लखन गजबन्सी (वय ६) अशी खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. त्या दोघी उद्यानात खेळत होत्या. खेळत असताना, उद्यानात असलेल्या खड्ड्यातील पाण्यात त्या दोघी पडल्या. आजूबाजूला कोणीही नसल्याने हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. उद्यानात खेळायला गेलेल्या मुली बराच कालावधी झाला तरी घरी आल्या नाहीत म्हणून शोधाशोध केली.