वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील आंबी, वराळे गावच्या हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी तसेच ग्रामपंचायतीचे दूषित सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडल्याने नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे़ या गटारगंगेमुळे नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्याने जलचरांचा मृत्यू होत आहे. या नदीच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असून, नदीचे पाणीच जलचर, प्राणी व मानवाच्या आरोग्यास धोकादायक झाले आहे. नदीपात्रात सोडले जाणारे रासायनिक व दूषित सांडपाणी रोखून नदीपात्रातील जलपर्णी काढून नदीचे पात्र स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या मावळ तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने मावळ तालुक्यात इंद्रायणी, पवना, कुंडलिका, सुधा, आंद्रा आदी नद्यांचे पात्र असून त्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. मावळ तालुक्याला वरदान असलेल्या नद्यांचे पाणी अमृत मानले जात होते. त्याच नद्यांचे पाणी विष ठरले असून जलचर, प्राणी व मानवाच्या आरोग्यास धोकादायक झाले आहे.इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाणारे औद्योगिक क्षेत्रातील तसेच नागरीवस्तीतील दूषित पाणी त्वरित बंद करून नदीपात्रातील जलपर्णी काढून नदीचे पात्र स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दूषित सांडपाणी व्यवस्थापनाची गरजऔद्योगिक क्षेत्राचा दिवसेंदिवस विकास झाल्याने नागरीकरणात वाढ होत आहे. एकेकाळी ओस असलेली गावे दाट लोकसंख्येच्या शहरात रूपांतरीत होऊ लागले. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी, मैला तसेच कचरा ओढे व नाल्यातून पवित्र असलेल्या नदीपात्रात दिवसा ढवळ्या सोडले जात आहेत. तसेच ग्रामपंचायतीचे व गृहप्रकल्पांच्या दूषित सांडपाण्याचे व्यवस्थापन अथवा कोणतीही प्रक्रिया न करता सर्रास नदीपात्रात सोडले जात आहे.तसेच नदीपात्रात कपडे, म्हैशी, बैल, गायी, शेळ्या व मेंढ्या सर्रास धुतात. देवाच्या पूजेचे साहित्य व नारळ नदीपात्रात टाकले जात आहे. वाढत्या मासेमारीमुळे अमृत गंगा असलेल्या इंद्रायणी नदी गटारगंगा झाल्याने मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. या जलपर्णीमुळे जलचरांचा मृत्यू होत असल्याने अनेक दुर्मिळ जातींचे जलचर नामशेष होत आहेत. नदीचे दूषित पाणी पिल्याने जनावरे आजारी पडत आहे. नागरिकांना नदीच्या पाण्यामुळे त्वचेचे आजार होत आहेत. इंद्रायणी नदीचे पाणी मानवाला तर सोडाच जनावरांनाही पिण्या योग्य राहिले नाही. जलपर्णीच्या विळख्यामुळे नदीचा परिसर विद्रूप झाले आहे.