औद्योगिकनगरीमधील नाट्यगृहे होणार आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:21 AM2018-11-26T00:21:59+5:302018-11-26T00:22:07+5:30
महापालिका : बुकिंगसाठी नवीन संगणकप्रणाली तयार करण्याच्या हालचाली
पिंपरी : महापालिका क्षेत्रात असणाऱ्या नाट्यगृहांच्या तारखांवरून वाद होत असतात. ते टाळण्यासाठी नाट्यगृह बुकिंगमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केले जाणार असून, आॅनलाइन बुकिंग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे नाट्यगृहांच्या तारखांचा काळाबाजार थांंबणार आहे. नाट्यगृहांच्या आरक्षणाच्या तारखा आॅनलाइनद्वारे देण्याबाबत अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी पुढाकार घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, भोसरीत कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे नटवर्य निळू फुले सभागृह, संत तुकारामनगर येथे आचार्य अत्रे सभागृहे आहेत. तसेच प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहाचे काम सुरू आहे. नाटकांचे प्रयोग, सांस्कृतिक कार्यक़्रम, स्रेहसंमेलने, राजकीय सभा, संमेलने, संगीत महोत्सव, व्याख्याने यासाठी नाट्यगृहे आणि सभागृहे भाड्याने दिले जातात. चिंचवड आणि पिंपरीत नाट्यप्रयोगांचे प्रमाण अधिक असते, तर विविध कार्यक्रमांसाठी आचार्य अत्रे आणि प्रा. मोरे सभागृहाला अधिक मागणी असते. त्यामुळे तारखावरून वाद होण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तसेच तारखा विकण्याचा धंदाही काही व्यवस्थापनांनी सुरू केल्याचे उघड झाले होते. तसेच राजकीय आणि प्रशासकीय वजन वापरून तारखा फिरविण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे निर्मात्यांना त्रास झाला होता.
समस्यांचा पाढा वाचला
चिंचवडच्या प्रा. मोरे नाट्यगृहाचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे, तर पिंपरीतील अत्रे सभागृहाचे काम सुरू आहे. प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहांचे काम रखडले आहे. त्याकडे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष नाही. नाट्यगृहांच्या प्रश्नाबाबत अतिरिक्त आयुक्त यांनी प्रभागस्तरीय अधिकारी आणि कर्मचाºयांची बैठक घेतली. त्या वेळी अधिकाºयांनी समस्यांचा पाढा वाचला. नाट्यगृहामधील अपूर्ण स्थापत्य कामे, स्वच्छता आणि बुकिंगच्या तारखांविषयी चर्चा झाली.
या वेळी चिंचवड येथील नाट्यगृहाचे काम झाल्यानंतर राडारोडा पडून आहे, तसेच स्वच्छतागृहातील अस्वच्छता या विषयीही सूचना केल्या.