पिंपरी : कोरोनाच्या प्रादूभार्वामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले उद्योग व्यवसाय येत्या दोन दिवसात सुरू होणार आहेत. कंपन्यांमध्ये ३३ टक्के उपस्थिती ठेवून उद्योग दोन दिवसांत सुरू करता येतील, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांन नियमावली तयार करण्याचे काम सुरू केले आहे. ३३ टक्के उपस्थिती आणि कामगारांना स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्याची अट घालण्यात आली आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव सुरूवातीला पुण्यात आणि त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये वाढू लागल्याने संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे औद्योगिकनगरी म्हणून लौकिक असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील यंत्राची धडधड थांबली होती. कोरोनामुळे शहरातील लहान, मोठे, मध्यम असे जवळपास १०० टक्के उद्योग बंद आहेत. सुमारे ११ हजार उद्योग आणि तीन लाखापेक्षा अधिक कामगार काम करतात.लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात जिल्हयातील चाकण, तळेगाव, रांजणगाव या शहराभोवतालच्यया ग्रामीण भागातील उद्योगांना परवानगी मिळाली. त्या पाठोपाठ पिंपरी चिंचवडमधील उद्योग सुरू करावेत, अशी मागणी शहरातून करण्यात आली होती. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शासनाला प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार उद्यागमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत कार्यवाही केली. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज परवानगी दिली आहे. याबाबतचा आदेश महापालिकेला पाठविला आहे. ३३ टक्के उपस्थिती ठेवून काही अटींवर ही परवानगी दिली आहे. तसेच शहरात राहणाऱ्या कामगारांना त्यांच्या स्वतंत्र वाहतूक व्यवस्थेचा बंदोबस्त करूनच उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, चाकण, तळेगाव, हिंजवडी परिसरातील उद्योग सुरू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील कंपन्या सुरू व्हाव्यात, यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनास प्रस्तावही पाठविला होता. शासनाने याबाबत मार्गदर्शक सूचना पाठविल्या असून याबाबतचा आदेश तातडीने काढण्यात येईल. नियमावलीचे पालन करून उद्योग सुरू करता येणार आहेत.
औद्योगिकनगरीमधील यंत्राची धडधड दोन दिवसात होणार सुरू ; ३३ टक्के कामगार उपस्थितीची सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 6:17 PM
संचारबंदीमुळे औद्योगिकनगरी म्हणून लौकिक असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील यंत्राची धडधड थांबली होती.
ठळक मुद्देशहरात राहणाऱ्या कामगारांना त्यांच्या स्वतंत्र वाहतूक व्यवस्थेचा बंदोबस्त करूनच उद्योग सुरू औद्योगिकनगरीत सुमारे ११ हजार उद्योग आणि तीन लाखापेक्षा अधिक कामगार काम करतात